ठाणेकरांना आकारण्यात येणाऱ्या पाणी बिलात वाढ करण्याचे स्पष्ट संकेत शुक्रवारी महापालिका आयुक्त आर.ए.राजीव यांनी अर्थसंकल्प मांडताना दिले. महापालिका निवडणुकांच्या तोंडावर राजीव यांनी मांडलेला पाणी बिल दरवाढीचा प्रस्ताव सत्ताधारी शिवसेना-भाजपच्या नेत्यांनी गुंडाळून ठेवला होता. असे असताना पुन्हा एकदा पाणीबिलात वाढ करण्याचे सुतोवाच आयुक्तांनी केले आहे. तसेच शहरात २४ तास पाणी पुरवठा सुरु करण्यासाठी पायलेट प्रकल्प आखण्याची घोषणाही त्यांनी केली.  ठाणे महापालिकेचा येत्या वर्षांचा सुमारे २१७७ कोटी ६४ लाख रुपयांचा मुळ सुधारीत अर्थसंकल्प शुक्रवारी महापालिका आयुक्त आर. ए. राजीव यांनी महापौर हरिश्चंद्र पाटील यांना विशेष सभेत सादर केला. भांडवली कर मुल्यावर आधारीत प्रणालीचा स्विकार केला जात नसल्याने केंद्र व राज्य शासनाकडून मिळणाऱ्या दहा टक्के अनुदानास महापालिका यावर्षी मुकणार आहे, अशी माहिती यावेळी राजीव यांनी दिली. तसेच मालमत्ताकराच्या उत्पन्नामध्ये सुमारे ३२ कोटींची तुट सोसावी लागेल, असा दावाही त्यांनी केला. या अर्थसंकल्पात शहरातील वेगवेगळ्या नव्या प्रकल्पांसह वाहतूक तसेच रस्ते प्रकल्पांवर अधिक भर देण्यात आला आहे. ठाणे महापालिकेचा येत्या वर्षांचा अर्थसंकल्प फेब्रुवारी ते मार्च २०१२ या कालावधीत तयार करण्यात आला होता. मात्र, स्थायी समितीची रचना राजकीय वादात तसेच न्यायालयाच्या फेऱ्यात अडकल्याने हा अर्थसंकल्प चर्चेला घेण्यात आला नाही. दरम्यान, या वर्षांतील सहा महिन्यांचा कालावधी संपला असून स्पील ओव्हरची रक्कम तसेच शहरात सुरु असलेली विकास कामे याचा विचार करून महापालिका प्रशासनाने सुमारे २१७७ कोटी ६४ लाख रुपयांचा सुधारीत मुळ अर्थसंकल्प तयार केला आहे.
शहरातील सर्व रस्ते सुस्थितीत तसेच सुदृढ ठेवण्यावर या अर्थसंकल्पात भर देण्यात आला असून महापालिका क्षेत्रातील १३३ कि.मी लांबीचे डांबरी रस्त्यांचे आधुनिक तंत्रज्ञान पद्धतीने पुनर्पुष्टीकरण व मजबुतीकरण करण्याचा प्रकल्प आखण्यात आला आहे. पोखरण रोड येथील वर्तकनगर जंक्शन येथे पुर्व द्रुतगती महामार्गावरील दोन्ही बाजूस असलेले सव्‍‌र्हिस रस्ते जोडण्यासाठी उड्डाणपुल उभारणे यासारख्या कामांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. ठाणेकरांच्या सहभागातून शहराचा विकास करण्यासाठी परिसर विकास कार्यक्रम राबविण्याची आखणी करण्यात आली आहे. विटावा, कौसा येथे शाळा विकास, ढोकाळी व बाळकुम येथे दवाखाना, शहरात विविध ठिकाणी पार्किंगची व्यवस्था व नवीन पार्किंग धोरण राबविण्याची आखणी करण्यात आली आहे. तलाव सौदर्यीकरण व जल साठय़ाचे संवर्धन, गुणवत्तापुर्ण शिक्षणावर भर, चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेचा विकास करण्याचे ठरविले असल्याचे त्यांनी सांगितले. कोंडवाडा, कत्तलखाना, स्मशानभुमी सुधारणा, विद्युत शवदाहीनी उभारणे तसेच पुर्व द्रुतगती महामागा उड्डाण पुल व सेवा रस्ते जोडणे, सौर सिटी पायलट प्रोजेक्टही राबविण्यासाठी आखणी केली आहे. त्याचबरोबर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाच्या फरकाचे एकरकमी वाटप करण्याचा प्रयत्न असल्याचेही राजीव यांनी स्पष्ट केले. यावेळी ठाणे परिवहन सेवा तसेच शिक्षण मंडळाचाही अर्थसंकल्प आयुक्तांनी सादर केला.