गेल्या मंगळवारी शहरात येऊन मध्य प्रदेशच्या दहशतवादविरोधी पथकाने दोघा संशयित तरुणांच्या अटकेची तथा तीन शक्तिशाली बॉम्बसह स्फोटके जप्तीची कारवाई करताना अन्य संशयित चार तरुणांनाही ताब्यात घेतले होते. परंतु चौकशीत त्यांचा कोणताही सहभाग नसल्याने व ते निर्दोष आढळून आल्याने त्यांना नंतर सोडूनही देण्यात आले. आपण दहशतवादासारख्या गंभीर गुन्ह्य़ात आरोपी ठरतो की काय, या केवळ कल्पनेनेच या तरुणांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा थरकाप उडाला होता. परंतु केवळ दैव बलवत्तर म्हणून आपण सुटलो, अशी प्रतिक्रिया सुटकेनंतर या तरुणांनी दिली.
मुस्लिम पाच्छा पेठेतून म. सादिक लुंजे तर किडवाई चौकातून उमेर दंडोती (रा. कर्णिकनगर) यांना ताब्यात घेताना यापैकी दंडोतीकडून तीन शक्तिशाली बॉम्बसह जिलेटिनच्या कांडय़ा, डिटोनेटर्स तसेच गावठी पिस्तूल व काडतुसे असा शस्त्रांचा साठा असलेली बॅग हस्तगत करण्यात आली होती. या दोघांना अटक करून इंदोर येथे नेण्यात आले आहे.
मध्य प्रदेश एटीएस पथकाने गेल्या आठवडय़ात शहरातून खालीद मुछाले यास पकडले होते. मुछाले हा इंदोर येथे २००८ साली सिमी संघटनेच्या दहशतवादी कृत्यात सहभागी झाल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. चार वर्षे शिक्षा भोगल्यानंतर अखेर वरिष्ठ न्यायालयाने गेल्या जानेवारीमध्ये अपिलात त्याला जामिनावर मुक्त केले होते. त्यामुळे गेले सुमारे वर्षभर मुछाले हा सोलापुरातच राहात होता. दरम्यान, खांडवा येथील कारागृहातून सहा दहशतवादी पळून गेल्यानंतर त्यापैकी डॉ. अबु फैझल या दहशतवाद्याबरोबर मुछाले याचा पुन्हा संपर्क आल्याचे आढळून आले. त्यामुळे त्याला गेल्या आठवडय़ात अटक झाली होती. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्याच्याकडे केलेल्या तपासात लुंजे व दंडोती यांचाही संपर्क झाल्याचे दिसून आले. त्या आधारे लुंजे व दंडोती यांना पकडण्यात आले.
दरम्यान, खांडवा कारागृह फोडून पळून गेलेल्या सहा दहशतवाद्यांपैकी इब्राहिम डॉन नावाचा संशयित दहशतवादी सोलापूरजवळ कुंभारी येथे मुछाले याच्या मदतीने येऊन एक दिवस राहिला होता. त्या वेळी सांभाळण्यासाठी त्याने दिलेली स्फोटकांची बॅग मुछाले याने प्रथम लुंजे याच्या ताब्यात दिली व नंतर लुंजे याने ती बॅग दंडोतीकडे सुपूर्द केली. दंडोती याने ही बॅग उघडून पाहिलीही होती. परंतु त्याची वाच्यता त्याने कोठेही केली नाही. परंतु हे प्रकरण अंगलट येण्याची चिन्हे स्पष्ट होताच त्याने आपल्या एका मित्राला गाठून ही बॅग एक तास सांभाळण्यासाठी दिली होती. त्या मित्राने विश्वास ठेवून ती बॅग ताब्यात घेतली. परंतु बॅगेत काय आहे, हे त्याने अजिबात पाहिले नव्हते. तथापि, काही वेळातच दंडोती याने स्वत: ही स्फोटकांची बॅग मित्राकडून परत घेतली व एटीएस पथकाच्या हवाली केली. एटीएस पथकाने दंडोती याच्या त्या मित्राला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता तो निर्दोष असल्याचे आढळून आले.
हीच बाब डॉ. इब्राहिम डॉन याने कुंभारीच्या कॉ. गोदूताई परुळेकर विडी घरकुल वसाहतीत ज्याच्या घरी मुक्काम केला होता, त्या व्यक्तीलाही ताब्यात घेण्यात आले होते. मात्र त्याचा व डॉ. इब्राहिम डॉन याचा थेट परिचय नव्हता. तो दहशतवादी असल्याचीही कल्पना त्यास नव्हती. केवळ मुछाले याच्या आग्रहाखातर त्याने इब्राहिम डॉन यास आपल्या घरी आसरा दिल्याचे दिसून आले. सखोल चौकशीत त्याचा दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग नसल्याने त्यालाही नंतर सोडून देण्यात आले. अशीच परिस्थिती पाच्छा पेठेतील खड्डा परिसात राहणा-या एका तरूणाची होती. या तरूणाकडे मित्र लुंजे याने कागदपत्रे असलेली फाईल सांभाळण्यासाठी दिली होती. त्याने लगेचच ही फाईल लुंजे याच्याकडे परत केली. त्यालाही एटीएस पथकाने जबाब घेऊन सोडून दिले. अशा प्रकारे चारही तरुणांना चौकशीअंती सोडून देण्यात आल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.