दुसऱ्याला जो त्रास सहन करावा लागतो, तीच वेळ आपल्यावरही आलेली किंवा येणार असते ही जाणीवच मुंबईला ‘प्रामाणिक शहरा’चा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरविण्यास कारणीभूत ठरली आहे. रेल्वेच्या चौथ्या सीटवरील प्रवास असो, किंवा ‘रांगेचा फायदा सर्वांना’सारख्या घोषणांचा प्रभाव असो, प्रत्येकाला सोसाव्या लागणाऱ्या त्रासाच्या जाणिवेमुळेच हे शहर प्रामाणिक बनल्याची मुंबईकरांचीच भावना आहे.

रस्त्यावर पडलेल्या पाकिटातील रकमेचा मोह न होता ते परत देण्याचा उदारपणा मुंबईकरामध्ये मोठय़ा प्रमाणात आढळल्याने, ‘रीडर्स डायजेस्ट’ने घेतलेल्या जागतिक सर्वेक्षणानुसार मुंबई हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे प्रामाणिक माणसांचे शहर ठरले आहे. ‘बेवारशी वस्तूला स्पर्श करू नका’, अशा सातत्याने कानावर आदळणाऱ्या उद्घोषणादेखील प्रामाणिकपणा वाढविण्यास कारणीभूत ठरत असल्याचे अनेकांना वाटते. म्हणूनच, उपनगरी रेल्वेतील एखादा सहप्रवासी रॅकवर आपली भरलेली बॅग विसरून उतरू लागल्याचे लक्षात येताच सारे सहप्रवासी त्याला बॅगची आठवण करून देतात. मुंबईवर झालेल्या असंख्य हल्ल्यांमुळे दाटलेली असुरक्षिततेची भावना हेदेखील त्या ‘प्रामाणिकपणा’मागचे कारण असल्याची कबुलीही अनेक उपनगरी प्रवासी देतात. ही सवय इतकी अंगवळणी रुजली आहे, की एखादा सहप्रवासी आपल्या हातातले वर्तमानपत्र बाकडय़ावरच सोडून स्टेशनवर उतरून गेला, तरी ते वर्तमानपत्रदेखील कुणी घेत नाही. उलट, दुसऱ्या एखाद्या प्रवाशाला परतीच्या प्रवासात वाचावयास उपयोगी पडावे म्हणून, रॅकवर काळजीपूर्वक ठेवले जाते, असाही रेल्वे प्रवाशांचा अनुभव आहे.
अफाट लोकसंख्येमुळे नागरी सुविधांवर ताण पडत असल्याने, काही वेळा नियमांना बगल देऊन वीजचोरी किंवा पाणीचोरी करण्यासही मुंबईकर धजावतो, पण त्यातही शिस्त असते. अशी चोरी करताना संबंधितांचे हात ‘ओले’ करावे लागतात, आणि त्यात ‘लबाडी’ न करता ‘प्रामाणिकपणा’ दाखविला जातो, असेही एका पाहणीत आढळून आले आहे. लाच देऊन काम करून घेणे सगळीकडेच असले, तरी मुंबईत मात्र, लाच घेणारा प्रामाणिकपणे कामही करतो, त्यामुळे ‘लाचखोरी’च्या व्यवहारावरील विश्वास कायम आहे, असे काही मुंबईकर सांगतात!..‘चोरी’ हा प्रामाणिकपणाचा अपवाद असल्याचे बोलले जात असले, तरी मुंबईकरांना हेदेखील मान्य नाही! एखाद्या गर्दीच्या ठिकाणी पाकिटमाराने ‘हातसफाई’ करून खिसा कापला आणि पाकिटात काहीच आढळले नाही, तर पाकिटातील एखाद्या पत्त्याच्या आधारावर पाकिट परत करण्याचा प्रामाणिकपणा दाखविणारे खिसेकापू अनेक उपनगरीय प्रवाशांनी अनुभवले आहेत. पाकिटातला उपयोगी नसलेला ‘ऐवज’ मालकाला परत पाठविण्याचा प्रामाणिकपणाही पाकिटमारांकडून दाखविला जातो, असे प्राजंळपणे सांगणारे मुंबईकरही भेटतात. प्रामाणिकपणाची ही भावना मुंबईकरांच्या स्वभावातच रुजली आहे, पण लोंढे वाढू लागले, गर्दी वाढू लागली, तर ती टिकून राहील का, अशी भीतीही काहींनी व्यक्त केली.  
सामान्य मुंबईकर एकमेकांशी प्रामाणिकपणाने खरे बोलतात. एखाद्या ठिकाणी जाण्याचा रस्ता विचारला, तर अन्य अनेक शहरांत नेमका विरुद्ध रस्ता दाखविला जातो, किंवा नवखा माणूस पाहून रिक्षावालेदेखील मीटर वाढविण्यासाठी शहराला वळसे घालत फिरवितो. पण असा अनुभव असलेला पाहुणा मुंबईत मात्र, रिक्षा-टॅक्सीवाल्यांच्या, किंवा पानवाल्याच्या, पादचाऱ्याच्या प्रामाणिक मार्गदर्शनामुळे भारावून जातो. अगदीच लक्षात आले नाही, तर ‘अ‍ॅड्रेस क्या है’, असं तो विचारतो, तरीही लक्षात आले नाही, तर ‘सॉरी’ म्हणून दुसऱ्या कुणाला तरी विचारून योग्य पत्ता शोधण्यास मदतही करतो.
मुंबईकरांच्या प्रामाणिकपणाचे मूळ त्याच्या सहनशीलतेमध्ये दडले आहे. कारण, अशा वेळी दुसऱ्याला होणारा त्रास त्यानेही अनुभवलेला असतो..