तीन सरकारी कर्मचाऱ्यांच्या मुलांनी कळंबोली येथील तरुणाकडून विक्रीसाठी घेतलेल्या  पिस्तुलाचा सुगावा खारघर पोलिसांनी लावला आहे. मुलांना हे पिस्तूल विक्रीसाठी देणाऱ्या चौथ्या आरोपीला पोलिसांनी पकडले आहे. या संशयित आरोपीचे नाव प्रदीप राय असे आहे. कळंबोली येथे राहणाऱ्या प्रदीपने हे पिस्तूल व काडतुसे बनारस येथून आणली होती, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदा होडगे यांनी दिली.
खारघर पोलिसांनी बुधवारी रात्रगस्तीमध्ये संकेत गायकवाड, आकाश जाधव आणि सागर जाधव या तिघा तरुणांना संशयावरून पकडल्यानंतर हा शस्त्रविक्रीच्या व्यवसायाची पोलखोल झाली. पोलिसांनी ही शस्त्रे पुरविणाऱ्या प्रदीपचा शोध घेतला. प्रदीप हा कळंबोली येथील सेक्टर १ मध्ये मंडप डेकोरेटर्सचे काम करतो. सागर, संकेत व आकाशप्रमाणे प्रदीप यालाही झटपट दुपट्ट पैसा या शस्त्रविक्रीच्या व्यवसायातून कमवायचा होता. प्रदीपने बनारस येथे एका व्यक्तीकडून हे पिस्तूल ३५ हजार रुपयांना विकत घेतले होते, परंतु हे पिस्तूल विक्री केल्यावर त्याची रक्कम आणून देईल, या बोलीवर हा व्यवहार झाला होता. त्यामुळे प्रदीपने हे पिस्तूल व काडतुसे खारघरच्या या तरुणांना ६५ हजारांना विकली. पोलिसांच्या अटकेत असलेले हे तीनही तरुण या पिस्तुलाला त्याहून पुढे चढय़ा भावाने विकून प्रदीपला पैसे देणार होते, परंतु बुधवारी रात्री एका दुचाकीवरून तिघेही संशयितरीत्या फिरत असल्याने त्यांना पोलिसांनी हटकले, त्यामुळे शस्त्र खरेदी-विक्रीच्या उधारीच्या व्यवसायाला वाचा फुटली. सागर, संकेत व आकाश यांचे पालक सरकारी कर्मचारी आहेत. दहावी ते बारावीचे शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या पालकांना पोलिसांनी समज दिली. सोमवारी या संशयित आरोपींची पोलीस कोठडी संपल्याने त्यांना पनवेल येथील न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली.