दोन लाखांच्या हिस्सेवाटणीमुळे मतभेद झाल्याने पोलीस ठाण्यातच एकमेकांना बदडून काढणाऱ्या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस आयुक्तांनी निलंबित केले आहे. याप्रकरणात कारणीभूत असलेल्या रामलाल कटरे या बिल्डरला पोलिसांनी अटक केली आहे.
ही मारामारीची घटना रविवारी सायंकाळी कळमना पोलीस ठाण्याच्या आवारातच घडली होती. बहुचर्चित अनंत सोनी हत्याकांडातील आरोपी बिल्डर रामलाल कटरे याने मरण पावलेल्या सोनीच्या पत्नीचा भूखंड हडपण्याचे प्रयत्न केले होते. त्याची तक्रार करणाऱ्या सोनीच्या पत्नीला कळमना पोलीस ठाण्यातील नागोराव तुळशीराम इंगळे (५१) आणि मेघनाथ विश्वनाथ तरडे (३७) या दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी तिच्या तक्रारीची दखल घेतली नाही. त्यांनी आरोपी कटरला मदत करून त्याबदल्यात इंगळेने ५० हजार आणि तरडेने दीड लाख रुपये घेतल्याची चर्चा होती. ही माहिती मिळाल्याने इंगळेने तरडेला दीड लाखातील ५० हजार मागितले. तरडेने नकार दिल्याने त्यांच्यात वाद पेटला. दरम्यान, रविवारी सायंकाळी इंगळे पत्नी आणि मुलांसह कळमना ठाण्यात पोहोचल्यानंतर तरडेने त्याच्यावर हल्ला चढवला. प्रत्युत्तरात इंगळेच्या मुलांनी आणि पत्नीने तरडेला चपलेने झोडपून काढले. यानंतर या दोघांनी एकमेकांविरुद्ध तक्रारी दिल्या. त्यामुळे दोघांवरही गुन्हे दाखल झाले. दरम्यान, या प्रकरणाची वाच्यता झालीच. त्याची दखल पोलीस आयुक्त के.के. पाठक यांनी घेतली व इंगळे व तरडेच्या निलंबनाचे आदेश काढले. या घटनेची पोलीस वर्तुळात खमंग चर्चा आहे.