News Flash

शेतकऱ्यांना वगळून राजकीय कार्यकर्त्यांचा भरणा

प्रत्येक जिल्ह्य़ात कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) स्थापन करून कृषी विस्तार करण्याच्या कामालाही आता राजकीय ग्रहण लागले असून अमरावती

| December 3, 2013 07:49 am

प्रत्येक जिल्ह्य़ात कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) स्थापन करून कृषी विस्तार करण्याच्या कामालाही आता राजकीय ग्रहण लागले असून अमरावती जिल्ह्य़ातील दर्यापूर येथील ‘आत्मा’ समिती बरखास्त करून नियमबाह्य़रीत्या सत्ताधाऱ्यांच्या प्रभावळीतील सदस्यांची निवड करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यासंदर्भातील चौकशी अहवालातही या घुसखोरीच्या प्रकारावर आक्षेप घेण्यात आला आहे.
केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाने १९९८ पासून जागतिक बँकेच्या सहाय्याने अमरावतीसह राज्यातील चार जिल्ह्य़ांमध्ये राष्ट्रीय कृषी तंत्रज्ञान प्रकल्प हा पथदर्शी प्रकल्प म्हणून राबवण्यात आला. त्यानंतर त्याचा राज्यात विस्तार करण्यात आला. ‘आत्मा’अंतर्गत कृषी आणि निगडीत विषयांसोबत शेतकऱ्यांचा समन्वय घडवून आणणे आणि शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे, असे उपक्रम राबवले जातात. ‘आत्मा’अंतर्गत तालुका स्तरावरही सल्ला समित्या कार्यरत आहेत. या समितीतील अशासकीय सदस्यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा असतो. अमरावती जिल्ह्य़ातील दर्यापूर तालुक्यात ‘आत्मा’ समितीची निवड ३ जानेवारी २०१२ रोजी करण्यात आली. मात्र, या समितीचा कालावधी संपण्याच्या आधीच ‘आत्मा’च्या मार्गदर्शक नियमांना डावलून ही समिती बरखास्त करण्यात आली. एवढय़ावरच न थांबता जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अनिरुद्ध बबलू देशमुख यांनी सादर केलेल्या यादीमधील १८ जणांचा शेतकरी प्रतिनिधी म्हणून नवीन शेतकरी सल्लागार समिती स्थापन करण्यात आली. राजकीय पुढाऱ्यांच्या इशाऱ्यावर सरकारी यंत्रणा कशी वेगवान होते, याचे हे उत्तम उदाहरण ठरले आहे.
तत्कालीन जिल्हा कृषी अधीक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे ३ जानेवारी २०१२ रोजी एक टिपणी सादर करून दोन वर्षांच्या कालावधीसाठी दर्यापूर तालुका शेतकरी सल्ला समितीच्या सदस्यांच्या नियुक्तीसाठी मान्यता घेतली होती. या समितीचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर जिल्हा कृषी अधीक्षकांच्या प्रस्तावानुसार नवीन समिती नियुक्त करण्यात येईल, असे राज्य शासनाचे निर्देश आहेत. या समितीचे कार्य सुरळीत सुरू होते. या समितीच्या पाच बैठका देखील झाल्या. पण अचानकपणे १७ जानेवारी २०१३ रोजी ही समिती बरखास्त करण्यात आल्याने सदस्यांना चांगलाच धक्का बसला. ज्यांना या समितीत सहभागी होऊन शेतकरी हिताचे कार्य करायचे आहे त्यांनी सर्वप्रथम तालुका कृषी अधिकाऱ्याकडे अर्ज सादर करावा, कृषी अधिकाऱ्यांनी अर्जाची तपासणी करून अर्जकर्त्यांची गुणपत्रिका तयार करावी, ही यादी प्रकल्प संचालकांकडे पाठवावी, असे नियमावलीत नमूद आहे. दर्यापूरची समिती बरखास्त केल्यानंतर नवीन समिती निवडताना यातील १७ सदस्यांचे अर्जच तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे प्राप्त नव्हते, त्यामुळे त्यांची पडताळणी, गुण प्रस्तावित करणे, या प्रक्रियेलाच फाटा देण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाच्या लेटरहेडवर विना तारीख, आवक-जावक क्रमांकाशिवाय पक्षाच्या कार्यकर्त्यांची यादी पाठवण्यात आली आणि याच यादीतून समितीचे सदस्य निवडण्यात आले, असा आक्षेप कृषीतज्ज्ञ अरविंद नळकांडे यांनी घेतला होता. यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांपासून ते ‘आत्मा’च्या कार्यकारी गटाच्या अध्यक्षांपर्यंत अनेकांकडे निवेदने पाठवली होती. नळकांडे यांच्या तक्रारीनंतर सामेती (आत्मा), चे उपसंचालक ए.एस. तांदळे यांच्या चौकशी समितीची स्थापना करण्यात आली. या समितीने आपला अहवाल सादर केला असून दर्यापूरची ‘आत्मा’ समिती सबळ कारणाशिवाय बरखास्त करण्याचे प्रयोजन समजून येत नाही, असे अहवालात नमूद आहे. जुन्या समितीच्या सदस्यांचा कार्यकाळ या प्रक्रियेदरम्यान ‘वाया’ गेल्याने आता कृषी विभाग यासंदर्भात काय निर्णय घेते, याकडे ‘आत्मा’ वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2013 7:49 am

Web Title: the aatma committee dismiss
Next Stories
1 ताडोबाबाहेरील ४२ वाघांचे संरक्षण व शिकार रोखण्यासाठी पथक?
2 ‘मिहान’मधील ८९.५३ हेक्टर जमिनीचे अद्यापही एमएडीसीला हस्तांतरण नाही
3 विधिसभेतील सदस्यांच्या शाब्दिक चकमकींमुळे कुलगुरूंचा सभात्याग
Just Now!
X