उरण-पनवेल राज्य महामार्ग क्रमांक ५४ वरील दास्तान टोलनाका ते करळदरम्यानच्या मार्गादरम्यान जेएनपीटीच्या सोनारी सी.डब्ल्यू.सी.च्या स्पीडी गोदामाकडे शॉर्टकटने जाण्यासाठी नवीन मार्ग तयार करण्यात आलेला आहे. या मार्गाने उरण-पनवेल राज्य मार्गातून जाण्यासाठी छेद देण्यात आलेला आहे. याकरिता राज्य महामार्गावर दोन मोठे गतिरोधक बनविण्यात आलेले आहेत. या गतिरोधकांमुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे.
 या गतिरोधकाचा अंदाज नसल्याने रविवारी रात्री एका चारचाकी वाहनाला झालेल्या अपघातात वाहनाचा चक्काचूर झाला असला तरी सुदैवाने वाहनातील व्यक्तींना दुखापत झालेली नाही. अशाच प्रकारचे अपघात दोन दिवसांपूर्वी झालेले आहेत.
या मार्गावरून प्रवास करणाऱ्यासाठी नव्याने तयार करण्यात आलेले गतिरोधक मृत्युदूत बनू पाहत असल्याच्या प्रतिक्रिया या मार्गावरून प्रवास करणारे प्रवासी करीत आहेत. त्यामुळे या मार्गावरील गतिरोधकापर्यंत राष्ट्रीय राज्य महामार्ग प्राधिकरणाने पथदिव्यांची सोय करावी तसेच रात्रीच्या वेळी गतिरोधक असल्याचे वाहनचालकांच्या लक्षात यावे याकरिता गतिरोध पुढे असल्याचे संकेत देणारे फलक बसविण्याचीही मागणी करण्यात येत आहे.