रेणुका शुगर्सकडे चालविण्यास असलेल्या पंचगंगा कारखान्याकडे गाळपास असलेल्या उसाच्या बिलाबाबत फसवणूक झाल्याची तक्रार करण्यात आली आहे. फसवणूकप्रकरणी रेणुका शुगर्सच्या १० जणांवर गुन्हा दाखल करण्याची तक्रार सुनील भोजकर (रा. तळंदगे, ता. हातकणंगले) यांनी हुपरी पोलीस ठाण्यात दिली आहे.    
पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की रेणुका शुगर्स कंपनीने गंगानगर येथील रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा साखर कारखाना चालविण्यास घेतला आहे. यंदाच्या गाळप हंगामासाठी रेणुका शुगर्सने पहिली उचल एकरकमी विनाकपात २६०० रुपये प्रतिटन जाहीर केली. तसेच शेजारील इतर कारखान्यांनी जाहीर केलेल्या दरापेक्षाही १०० रुपये प्रतिटन जादा देण्याचेही जाहीर केले होते. मात्र परिसरातील जवाहर, श्री दत्त, गुरुदत्त कारखान्यांनी २६५० रुपये उचल जाहीर केली. तर कागलच्या शाहू कारखान्याने २७०० रुपये जाहीर केले आहेत. तर रेणुकाने शेतकऱ्यांना केवळ २६०० रुपये अदा केले आहेत. या कारखान्याने इतर कारखान्यांपेक्षा कमी दर दिला तसेच १०० रुपये अधिक रक्कम देण्याचेही खोटे आश्वासन देऊन माझ्यासह पंचक्रोशीतील हजारो शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. तेव्हा याप्रकरणी रेणुका शुगर्सच्या दहा जणांविरोधात तक्रार दिली असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
यामध्ये अध्यक्ष विद्या मुरकुंबी, उपाध्यक्ष नरेंद्र मुरकुंबी, संचालक संजय असर, एक्कार्यकारी संचालक मदन येलगी, विजेंद्र सिंग, सिद्रम कलुती, हृषीकेश परंदेकर, सुरेंद्रकुमार तुतेजा, रॉबर्ट टेलर, ओम शर्मा यांचा समावेश आहे.