दोनदा लांबणीवर पडल्यानंतर अखेर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा नगर दौरा आता बारगळल्यातच जमा आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर स्थानिक नेते या दौ-यासाठी प्रयत्नशील होते, निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी हा दौरा व्हावा असाच प्रयत्न होता, मात्र बुधवारी निवडणूक कार्यक्रमासह निवडणुकीची आचारसंहिताही लागू झाल्याने हा दौरा आता बारगळल्यातच जमा आहे.
मागच्या महिन्यात दोनदा मुख्यमंत्र्यांच्या दौ-याचा कार्यक्रम जाहीर झाला होता. मनपा निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवरच या दौ-याच्या दृष्टीने स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या दृष्टीने त्याला महत्त्व होते. मात्री दोन्ही वेळेस हा दौरा लांबणीवर पडून आता तर मनपा निवडणुकीची आचारसंहिताच लागू झाली. मुख्यमंत्री आता आले तरी तो प्रचाराचा भाग असेल. त्यामुळे त्या दौ-याला मर्यादा पडणार आहेत.
दरम्यान, मनपा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने शहरातील राजकीय मोर्चेबांधणीला एकदम वेग आला आहे. भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पाचही प्रमुख पक्षांनी गेल्या दोन महिन्यांपासून त्यादृष्टीने तयारी चालवली असली तरी अजूनही सर्वांच्या हालचाली प्राथमिक टप्प्यातच आहेत. भाजप-शिवसेनेची युती व दोन्ही काँग्रेसची आघाडी या पातळ्यांवर या चारही पक्षांची प्राथमिक चर्चाही अद्यापि झालेली नाही. युती आणि आघाडी होणार अशी चिन्हे असली तरी सर्वच पक्ष आपापल्या मित्रपक्षाला खिंडीत गाठण्याच्या प्रयत्नात आहेत. विशेषत: भाजप-शिवसेना युतीतील संभाव्य खडाखडी इच्छुक व कार्यकर्त्यांना अस्वस्थ करणारी वाटते. त्याविषयी चिंताही व्यक्त होते.
उमेदवार, जागावाटप, युती, आघाडी अशा कोणत्याच गोष्टी ठरल्या नसल्या तरी काही जागांवरील उमेदवार निश्चित मानले जातात. या लढती चुरशीच्या होतील अशी चिन्हे आहेतच, मात्र वलयांकित उमेदवारांमुळे हे प्रभाग व या लढतींकडे सर्वाचेच आत्तापासूनच लक्ष आहे. प्रामुख्याने प्रभाग क्रमांक २०, २१ कडे शहराचेच लक्ष आहे. प्रभाग क्रमांक २० मध्ये भाजपचे विद्यमान नगरसेवक संजय चोपडा व खासदार दिलीप गांधी यांचे चिरंजीव सुवेंद्र यांच्यातील लढतीला कमालीची प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. खासदार गांधी यांनी या एकाच प्रभागात तब्बल ९० लाख रुपयांच्या विकासकामांचा धडाका उडवून देत यातील प्रतिष्ठेचा मुद्दाच अधोरेखित केला आहे. प्रभाग २१ मध्ये शिवसेनेचे आमदार अनिल राठोड यांचे चिरंजीव विक्रम रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. मनसेचे विद्यमान नगरसेवक किशोर डागवाले यांच्याशी त्यांची लढत होईल. राठोड यांनीही या प्रभागात विकास कामांची मोठी राळ उडवून दिली आहे. शिवाय याच प्रभागातून मनसेचे नेते वसंत लोढा तथा माजी नगराध्यक्षा लता लोढा यांच्या नावाची चर्चा आहे. भाजपचे नरेंद्र कुलकर्णी यांच्या पत्नी गायत्री यांच्याशी त्यांच्या लढतीची शक्यता आहे. या सर्वच वलयांकित उमेदवारांमुळे या प्रभागांकडे आतापासूनच नगरकरांचे लक्ष आहे.
भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष अभय आगरकर हेही स्वत: यंदा निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता पक्षाच्या गोटात व्यक्त होते. त्यांचा प्रभाग क्रमांक २७ सर्वसाधारण वर्गासाठी खुला असून तेथून त्यांची चाचपणी सुरू असल्याचे सांगण्यात येते. मात्र शिवसेनेकडून विद्यमान महापौर शीला शिंदे किंवा त्यांचे पती अनिल शिंदे यांनीही या जागेवर दावा सांगितला आहे. त्यामुळेच येथे युतीत पेच निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होते. शिवाय या प्रभागातील दुस-या जागेवर भाजपचा म्हणजे उपमहापौर गीतांजली काळे यांचा दावा असल्याने हाही प्रभाग वलयांकित ठरण्याची चिन्हे आहेत.