शहर बससेवेसाठी नव्या ऑपरेटरच्या ईओआयला महापालिकेच्या एनएमपीएल संचालक मंडळाने मंजुरी दिली आहे. श्री साईताज कृपा कंपनीने महापालिकेच्या ईओआयला प्रस्तावरूपाने प्रतिसाद दिल्यानंतर एनएमपीएलच्या संचालक मंडळाने त्यांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. प्रस्तावातून विविध रंगांच्या बसेस चालविण्याचा नव्या ऑपरेटरने प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावाला महापालिका स्थायी समिती आणि महापालिका आयुक्तांनी मंजुरी मिळाल्यानंतरच तो मार्गी लागण्याची शक्यता आहे.
वंश निमय कंपनीकडे सध्या शहर बससेवेची जबाबदारी आहे. ही कंपनी ५-६ वर्षांपासून ही व्यवस्था सांभाळत असल्यामुळे समस्या कायम आहेत. कंपनीच्या मनमानी कारभाराविरुद्ध ओरड झाली, अनेक तक्रारी आल्या. अनेक बसेसच्या काचा फुटल्या, बसण्याच्या खुच्र्यासुद्धा तुटल्या असून फक्त ४७ मार्गावरच बसेस धावत आहे. महापालिकेला वंश निमयने सेवा बंद करण्याबाबत नोटीस दिली होती. त्यामुळे शहर बससेवेसाठी अन्य ऑपरेटर नेमण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.   
शहर वाहतुकीसाठी दोन ऑपरेटर राहतील, हे निश्चित झाले आहे. शहरात १०० बसेस चालविण्यास श्रीसाईताज कृपा ही कंपनी तयार आहे. स्टार बसेस ज्या मार्गावर धावत आहे त्या मार्गाव्यतिरिक्त रस्त्यांवर बसेस चालविण्याची तयारी साईताजने दर्शविली आहे. त्यासाठी वेगळ्या रंगाच्या बसेस चालविण्यात येतील, असेही साईताजच्या प्रस्तावात म्हटले आहे. त्यामुळे बसेसच्या रंगावरूनच बस कोणत्या मार्गावरून जाईल आणि कुठे थांबेल हे प्रवाशांना कळू शकेल. त्यामुळे बस जवळ आल्यास प्रवाशांची तारांबळ उडणार नाही. कंपनीच्या ३५ आसनी वाहनांमध्ये १४ जागा महिलांसाठी  राखीव ठेवण्यात येणार आहेत. बसेसचा रंग वेगवेगळा राहणार असून काही दिवसातच बसचा मार्ग प्रवाशांच्या लक्षात येईल.
प्रत्येक बसमध्ये दिल्ली मेट्रोप्रमाणे एलएडी स्क्रीन राहणार असून त्यात समोर येणाऱ्या स्थानकाची माहिती राहील. त्याचप्रमाणे बसमधील स्पीकरवरून थांब्याच्या नावाचा पुकाराही होईल.  बसची उंची इतर बसच्या तुलनेने कमी राहणार आहे. बस थांब्यावर येताच लोकांना बस कुठे जाते याची विचारणा करावी लागते. तसेच बसमधून प्रवास करणाऱ्या बाहेरच्या प्रवाशांना समोरचे स्थानक कोणते आहे याची माहिती नसते. त्यामुळे प्रवासी उतरण्यासाठी गडबड करत असतात हे चित्र शहरात नवीन नाही. परंतु, आता असे चित्र दिसणार नाही. कारण बसवर स्थानकांची पाटी लावली जाणार आहे.