जून २०१३ मध्ये अर्धवट सुरू झालेला पूर्व मुक्त मार्ग आता नऊ महिने उलटून गेले तरीही शेवटच्या टप्प्यापर्यंत म्हणजेच घाटकोपपर्यंत सुरू झालेला नाही. डिसेंबर २०१३ आणि मार्च २०१३ हे दोन्ही मुहूर्त हुकले असून आता आणखी दोन महिने लागतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. जानेवारी २०११ मध्ये अपेक्षित असलेला प्रकल्प आता २९ महिने उशीर होऊनही पूर्ण सुरू न झाल्याने या प्रकल्पाचा खर्च २५८ कोटी रुपयांनी वाढला आहे. दक्षिण मुंबईला थेट पूर्व उपनगरांशी जोडण्यासाठी बांधण्यात येत असलेल्या साडेसोळा किलोमीटर लांबीच्या पूर्व मुक्त मार्ग प्रकल्पाचा साडेतेरा किलोमीटरचा लांबीच्या टप्पा जूनमध्ये खुला झाला. पूर्व मुक्त मार्गाचा वाडीबंदर ते आणिक हा ९.२९ किलोमीटर लांबीचा पहिला टप्पा, आणिक ते पांजरापोळ हा ४.३ किलोमीटर लांबीचा दुसरा टप्पा १३ जून रोजी वाहतुकीसाठी खुला झाला. त्यामुळे मुंबईतून आणिकपर्यंत उन्नत मार्गाने (इलेव्हेटेड रोड) व नंतर आणिक ते पांजरापोळ दरम्यान डोंगरात बांधण्यात आलेल्या ५०० मीटर लांबीच्या भुयारी रस्त्याने प्रवास करत वाहनचालकांना अवघ्या १५-१६ मिनिटांत चेंबूरच्या शिवाजी पुतळय़ापासून वाडीबंदपर्यंतचा पल्ला गाठणे शक्य झाले आहे. त्यामुळे दररोज मुंबईहून नवी मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक जाणाऱ्या व तेथून येणाऱ्या सुमारे २४ ते २५ हजार वाहनांचा वेळ आणि इंधन दोन्हींची बचत होत आहे. आता घाटकोपपर्यंतच्या उर्वरित टप्प्याचे काम सुरू आहे.
दुसऱ्या टप्प्यातील बोगद्याचे काम आता आता संपले. तर तिसऱ्या टप्प्याचे काम अद्यापही रखडले आहे. हा रस्ता लवकरच खुला होईल असे ‘एमएमआरडीए’ जानेवारी २०१४ पासून सांगत असले तरी अद्यापही काम कधीपर्यंत संपेल हे खात्रीशीररित्या सांगता येत नाही.

* वाडीबंदर ते आणिकपर्यंतच्या   रस्त्याचा प्रकल्प खर्च ५३१ कोटी   रुपये होता. तो ५९० कोटी   रुपयांवर गेला. हा रस्ता   जून २०१३ मध्ये खुला झाला.
*  आणिक ते पांजरापोळपर्यंतच्या   रस्त्याचा मूळ खर्च १४८ कोटी रुपये    होता. तो आता २२१ कोटी  रुपयांवर      गेला असून काम अद्यापही सुरू आहे.
*  घाटकोपपर्यंतच्या अंतिम टप्प्याचा खर्च      १६८ कोटी रुपये होता. तो आता  २९३ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.      काम अजूनही सुरू असून नेमके
     कधी संपेल याची शाश्वती नाही.