गणेशोत्सव हा सर्व समाजाला जोडणारा उत्सव आहे. समाजातील विविध घटक या उत्सवाच्या निमित्ताने परस्परांतील मतभेद विसरून एकत्र यावेत आणि त्यांनी समाजाचा एकत्रित विचार करावा हीच अपेक्षा सार्वजनिक गणेशोत्सवाकडून असते. मराठी, गुजराती, हिंदी, उर्दू आदी विविध भाषक समाजाची संमिश्र वस्ती असलेल्या दहिसरच्या आंबेवाडी येथील ‘श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ’ ही अपेक्षा अगदी सार्थ करते. मंडळाचे यंदाचे ४१ वर्ष. आंबेवाडी दहिसरमध्ये गणली जात असली तरी बोरिवली स्थानकापासून अवघ्या दहा मिनिटांवर आहे. पण, स्थानकापासून आंबेवाडीला येईपर्यंत १० ते १५ वेगवेगळ्या सार्वजनिक गणपतींचे दर्शन घडते. त्यात आंबेवाडीचा सार्वजनिक गणपती सर्वात जुना. हा गणपती पाहण्यासाठी भाविकांची गर्दी जमते ती इथल्या भव्य सजावटीमुळे. किंबहुना सजावटीच्या रूपाने जनजागृतीच्या कल्पनांचा आविष्कार करणे, हेच मंडळाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
उत्सवाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करण्यासाठी दरवर्षी मंडळ सजावटीसाठी नावीन्यपूर्ण विषय निवडते. यंदा पोलीस आणि संरक्षण दलातील करिअरविषयक संधीची मोहिनी पालक आणि विद्यार्थ्यांवर पडावी, यासाठी मंडळाने ‘सैनिक हो देशासाठी’ ही आगळीवेगळी संकल्पना निवडली आहे. थर्माकोलसारख्या पर्यावरणाला घातक असलेल्या वस्तूंचा वापर टाळून दिगंबर चिचकर यांच्या कल्पनेतून हा भव्य देखावा उभारण्यात आला आहे. मुंबईत ज्याला त्याला डॉक्टर आणि इंजिनिअर व्हायचे आहे. देशप्रेम, देशाभिमान, देशाचे संरक्षण हा फक्त इतिहासच राहिला आहे. मुंबईतल्या तरुणांमध्ये जाज्वल्य राष्ट्रप्रेम रुजवून त्यांना सैन्य व पोलिस दलातील विविध संधीची माहिती या देखाव्यात करून देण्यात आली आहे. यात समाजाची मानसिकता, सैनिकी शिक्षणाचे मार्ग आणि पालकांच्या फाजील अपेक्षा यावर समाजाचे प्रबोधन करण्यात आले आहे. या भव्य देखाव्याच्या मधोमध साडेनऊ फुटांची गणेशमूर्ती विराजमान आहे.
गुजराती आणि राजस्थानी भजनांचा जल्लोष
आंबेवाडीची वस्ती कॉस्मोपॉलिटन. त्यामुळे गणेशोत्सवात येथे मराठी भजनांमधील टाळ-मृदुंगाबरोबरच गुजराती व राजस्थानी भजनांच्या ढोलाचाही आवाज घुमतो.
महागाईची झळ मोठी
आंबेवाडीची वस्ती तशी मध्यमवर्गीय व निम्न मध्यमवर्गीयांची. त्यामुळे, महागाई, मंदी आदी कारणांची झळ मंडळाला विशेषत्वाने पोहोचते आहे. रोषणाई, प्रवेशद्वार आदींवरील खर्च कमी करून मंडळाने त्यावर आपल्या परीने तोडगा काढल्याचे मंडळाचे चिटणीस गजानन साळवी यांनी सांगितले.
सामाजिक उपक्रम
मंडळाच्या दानपेटीत जमा होणारी रक्कम इथल्या ज्ञानधारा रात्रशाळेला मदतरूपाने दिली जाते. याशिवाय स्वच्छता मोहीम, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, क्रीडा स्पर्धा, रक्तदान शिबीर, दहिसरमधील पुष्पविहार कुष्ठरोगी वसाहतीतील मुलांना वह्य़ापुस्तक, गणवेश वाटप, दहावीच्या विद्यार्थ्यांकरिता मार्गदर्शनपर व्याख्यानमाला, मृतांच्या गरजू नातेवाईकांना अंत्यविधीसाठी मदत आदी सामाजिक उपक्रमांमध्ये मंडळाचा पुढाकार असतो.