‘चतुरंग प्रतिष्ठान’तर्फे संस्थेच्या चतुर्थ दशकपूर्तीच्या निमित्ताने मुंबईसह गोवा आणि चिपळूण येथे सांस्कृतिक कार्यक्रमांचेआयोजन करण्यात आले आहे. मुलाखत, गप्पा आणि संगीत मैफल असे स्वरूप असलेल्या या सर्व कार्यक्रमांना रसिकांना विनामूल्य प्रवेश आहे.
प्रभादेवी येथे रवींद्र नाटय़ मंदिरात ३१ मे रोजी दुपारी चार वाजता कवी-गीतकार गुलजार यांच्या साहित्यकृतींवर आधारित ‘बात पश्मीने की’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सचिन खेडेकर, किशोर कदम, पौर्णिमा मनोहर यांचे निवेदन असलेल्या या कार्यक्रमात विभावरी आपटे, स्वरदा गोडबोले, जितेंद्र अभ्यंकर, धवल चांदवडकर हे गायक व चित्रकार गिरीश चरवड सहभागी होणार आहेत. या वेळी ‘नाटय़संगीत दर्शन’ हा कार्यक्रमही होणार असून मंजुषा कुलकर्णी-पाटील (बालगंधर्व शैली) व शौनक अभिषेकी (पं. जितेंद्र अभिषेकी शैली) हे कलाकार सहभागी होणार आहेत. याचे निवेदन धनश्री लेले यांचे आहे. ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता आणि ज्येष्ठ पत्रकार निशिकांत जोशी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
२४ मे रोजी चिपळूण येथील गुरुदक्षिणा सभागृहात सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या ‘नाटय़संगीत शैलीदर्शन’या कार्यक्रमात शैला दातार व भरत बलवल्ली हे सहभागी होणार असून ते अनुक्रमे बालगंधर्व व मा. दीनानाथ मंगेशकर यांची गाणी सादर करणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन मंगला खाडीलकर यांचे आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या लोकसभा निवडणूक निकालाच्या पाश्र्वभूमीवर स्थानिक पक्षप्रतिनिधींशी प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ हे संवाद साधणार आहेत.
८ जून रोजी रवींद्र भवन, मडगाव, गोवा येथे सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या कार्यक्रमात कवी विष्णू सूर्या वाघ यांची प्रकट मुलाखत होणार आहे. त्यानंतर ‘संगीत मत्स्यगंधा’ या नाटकाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त होणाऱ्या ‘मत्स्यगंधा सुवर्णयोग’ कार्यक्रमात रामदास कामत, सुमेधा देसाई, चंद्रकांत वेर्णेकर, डॉ. अजय वैद्य, सिद्धी उपाध्ये सहभागी होणार आहेत. डॉ. विनय सहस्त्रबुद्धे हे ‘चतुरंग’विषयी आपले मनोगत व्यक्त करणार आहेत.