घरगुती गॅसची वाहनांसाठी विक्री करणा-या टोळीला सांगली पोलिसांनी रविवारी अटक करून ४४ सिलिंडरसह २४१ बोगस गॅस पुस्तके जप्त केली आहेत. अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान यांनी कवलापूर येथे धाड टाकून चार वाहनांसह सव्वाचार लाख रुपयांचा माल हस्तगत केला आहे.
    या कारवाईसंदर्भात माहिती देताना डॉ. प्रधान यांनी सांगितले, की कवलापूर गावात राहत्या घरामध्ये गॅसचा काळा बाजार होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गुंडा विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्यासह अन्य कर्मचा-यांच्या मदतीने छापा टाकण्यात आला असता अमोल पांडुरंग माळी (२६), बाजीराव राजाराम माळी (४२), सुनील बाबुराव कवठेकर (२५) आणि बाबुराव जयकुमार कवठेकर (५७) या चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. माळी व कवठेकर या दोघांच्या वेगवेगळय़ा घरात लपवून ठेवण्यात आलेले ४३ मोकळे व १ भरलेला गॅस सिलिंडर सापडले. याशिवाय गॅस भरण्याच्या चार मशिन्स, दोन इलेक्ट्रिक वजनकाटे, एक लहान टेम्पो आणि अवैध गॅसकीट असणा-या तीन मारुती मोटारी जप्त करण्यात आल्या.
    दोघांच्या घराची झडती घेतली असता कवलापूर येथील सिद्धेश्वर, विश्रामबाग येथील पाटणे, म्हैसाळ येथील एजन्सी खेराडकर, स्वाती, सांगली एजन्सी वखार भाग, मनोधन गॅस एजन्सी कवलापूर आदी गॅस एजन्सींची ग्राहकाकडे असणारी २४१ गॅस पुस्तके मिळून आली आहेत. आरोपींनी लाभार्थीच्या रेशन कार्डाच्या झेरॉक्सचा वापर करून गॅस एजन्सीकडून पुन्हा गॅस कनेक्शन घेण्यात आले. त्याचे गॅस नोंदणी पुस्तक तयार करून त्याद्वारे घरगुती वापराचे सिलिंडर मिळवून त्याचा वापर वाहनांसाठी केला जात होता. अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. चारही आरोपींवर बनावट दस्तऐवज तयार करणे, जीवनावश्यक कायद्याचा भंग करणे या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा स्वतंत्र पथकामार्फत तपास करण्यात येत असल्याचे डॉ. प्रधान यांनी सांगितले.