23 July 2019

News Flash

आर्थिक सुधारणांच्या नावाखाली शाब्दिक खेळ- कॉ. कांगो

सर्वच क्षेत्रांत होणाऱ्या बदलांना आíथक सुधारणा असे गोंडस नाव देऊन शब्दांचे खेळ सुरू आहे. या बदलांच्या परिणामांचा अभ्यास करून यातून नेमका कोणाचा फायदा होणार याचा

| February 27, 2014 03:05 am

सर्वच क्षेत्रांत होणाऱ्या बदलांना आíथक सुधारणा असे गोंडस नाव देऊन शब्दांचे खेळ सुरू आहे. या बदलांच्या परिणामांचा अभ्यास करून यातून नेमका कोणाचा फायदा होणार याचा विचार होत नाही, तोपर्यंत श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी कमी होणार नाही, असे प्रतिपादन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे प्रदेश सचिव डॉ. भालचंद्र कांगो यांनी केले.
आश्वी येथील कला, वाणिज्य व संगणक महाविद्यालयात ‘साहित्यक्षेत्रातील नवे प्रवाह आणि आíथक सुधारणा’ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्राचे उद्घाटन डॉ. कांगो यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जि. प. च्या सदस्या कांचनताई मांढरे होत्या. विखे पाटील कारखान्याचे उपाध्यक्ष रामभाऊ भुसाळ, माजी संचालक विनायकराव वालोटे, ट्रक सोसायटीचे संचालक भगवानराव इलग आदी या वेळी उपस्थित होते.
कांगो म्हणाले, कालपरत्वे सर्वच क्षेत्रांत बदल होत असतात. परंतु सुधारणांच्या नावाखाली नेमके काय बदल झाले, याची चिकित्सा होणे गरजेचे आहे. १९३० ते ७० या काळात लोककल्याणकारी संकल्पनेचा दबदबा होता. मात्र त्यानंतर परिस्थिती बदलली. इंदिरा गांधी यांनी बँकांचे राष्ट्रीयीकरण करून संकटावर मात केली, तरी जागतिक बँक आणि नाणे निधीकडे जाण्याचा मार्ग त्यांना स्वीकारावाच लागला. याच काळात तेल निर्माण करणाऱ्या देशांनी तेलाचे भाव वाढवल्याने संपूर्ण जगावरच संकट आले, मात्र योग्य नियोजन आणि रोजगार पुरेसा यामुळे सोव्हियत युनियन या एकमेव देशाची अर्थव्यवस्था अबाधित राहिली.
केवळ संधी मिळत नसल्याने गरिबी वाढत असून सरकारही यावर उपाय सुचवण्याच्या मन:स्थितीत नाही. स्वामिनाथन यांच्यामुळे झालेल्या हरितक्रांतीमुळे आज अन्नसुरक्षा कायदा येऊ शकला, परंतु त्यालाही विरोध होत असून नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यातील वादाचा मुद्दाही तोच असल्याचे आहे असा दावा कांगो यांनी केला.
सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर रंगनाथ शिंदे यांनी प्रास्ताविक केले. या चर्चासत्रात ७६ तज्ज्ञ सहभागी झाल्याची माहिती त्यांनी दिली. चर्चासत्राच्या संयोजनासाठी प्रा. देवीदास दाभाडे, प्रा. ओंकार रसाळ, प्रा. आर. एन. चव्हाण आदींनी सहकार्य केले. प्रा. वर्षां आहेर आणि प्रा. किशारे शेळके यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

First Published on February 27, 2014 3:05 am

Web Title: the literal sports in the name of economic reforms c kango
टॅग Rahata