News Flash

सर्वात महागडे ‘कुकबुक’

भारताला खूप मोठी खाद्यसंस्कृती लाभलेली आहे आणि त्याचे सर्व श्रेय देशातील गावागावांत भेटणाऱ्या खवय्याला जाते. ‘खाद्यपदार्थ’ हा भारतीय लोकांचा लाडका विषय आहे.

| January 13, 2015 07:54 am

– भारतीय शेफ विकास खन्ना लेखक
– भारताची खाद्य आणि उत्सवांची परंपरा सांगणारे पुस्तक
– लिलावामध्ये ८ लाखांपासून बोलीची सुरुवात करणार
– पुस्तकाद्वारे भारतातील तृतीयपंथीय लोकांना गौरवण्याचा मानस

भारताला खूप मोठी खाद्यसंस्कृती लाभलेली आहे आणि त्याचे सर्व श्रेय देशातील गावागावांत भेटणाऱ्या खवय्याला जाते. ‘खाद्यपदार्थ’  हा भारतीय लोकांचा लाडका विषय आहे. अगदी गल्लीबोळापासून ते थेट राजामहाराजांच्या राजवाडय़ांपर्यंत खाण्यावरच्या चर्चाचे फड सर्वत्र नियमाने रंगतात. भारतीयांच्या याच खाद्यप्रेमाला वंदन करणारे आणि त्याच्या चुरस कथा सांगणारे ‘उत्सव’ हे जगातील सर्वात महागडे ‘कुकबुक’ शेफ विकास खन्ना घेऊन येणार आहेत.
दक्षिण भारतीय जेवणामध्ये महत्त्वाचे स्थान पटकावलेले ‘सांबार’ ही खरे तर मराठय़ांनी त्यांना दिलेली देण आहे, तर नवाबी जेवणाची शान असलेली ‘दमबिर्यानी’ सुरुवातीला गुलामांचा पदार्थ होता. भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये विविध खाद्यपदार्थासोबत असा रंजक कथांचाही जन्म झाला आहे. इतिहासकाळापासून आपल्याकडील खाद्यसंस्कृतीमध्ये कित्येक बदल झाले. विविध राज्यांच्या संस्कृतींमध्ये त्यांच्या सण, परंपरा, रीतीभातींनुसार विविध पद्धतींची खाद्यसंस्कृती दिसून येते. भारतातील खाद्यसंस्कृतीसोबतच त्याला घडवणाऱ्या परंपरा, सणावारांचे एकत्र चित्रण शेफ विकास खन्ना त्यांच्या आगामी ‘उत्सव’ या ‘कुकबुक’मध्ये करणार आहेत. या पुस्तकामध्ये केवळ काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत विविध प्रांतांतील खाद्यपदार्थाच्या पाककृती नसतील, तर विविध सण-समारंभ आणि त्यानुसार प्रांतांगणिक घडत गेलेले खाद्यपदार्थ यांच्या कथांचाही समावेश असणार आहे. या पुस्तकासाठी विकास खन्नाने स्वत: गेली चार ते पाच वर्षे संपूर्ण भारताची भटकंती करून विविध फोटोज आणि माहितीचा संग्रह केला आहे.
या पुस्तकाचा लिलाव करण्यात येणार असून लिलावाच्या बोलीची सुरुवातच आठ लाखांपासून करण्यात येणार असल्याचे विकास खन्नाने सांगितले. विशेष म्हणजे दिवाळीपासून ते बारशापर्यंत विविध भारतीय सण-समारंभामध्ये अनन्यसाधारण स्थान पटकवणाऱ्या तृतीयपंथी लोकांना हे पुस्तक समर्पित करण्याचा मानस विकास खन्नाने या वेळी बोलून दाखवला. मूळ पंजाबी असलेल्या विकास खन्नाने लहानपणीच आपल्या जेवण बनवण्याच्या आवडीला व्यवसायाचे स्वरूप देत अमृतसर येथे ढाबा चालवला होता. २०१० साली न्यूयॉर्क येथे सुरू केलेल्या त्याच्या ‘जुनून’ हॉटेलला आज न्यूयॉर्कमधील नामांकित हॉटेल्सपैकी एक म्हणून गणले जाते. लवकरच तो ‘स्टार प्लस’वरील ‘मास्टर शेफ इंडिया ४’ या शोमधून परीक्षकाच्या भूमिकेतून लोकांच्या भेटीस येणार आहे.

– मृणाल भगत, मुंबई

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2015 7:54 am

Web Title: the most expensive cookbook
टॅग : Loksatta,News
Next Stories
1 पै फ्रेंड्स लायब्ररीची ‘लक्ष्यपूर्ती’!
2 पुन्हा एकदा ‘कथा’!
3 पं. सी. आर. व्यास हे ऋषितुल्य आणि ज्ञानवंत व्यक्तिमत्त्व – किशोरी आमोणकर
Just Now!
X