News Flash

कोटीच्या कोटी उड्डाणे घेणारे अर्थसंकल्पीय विमान जमिनीवर

एलबीटी, मालमत्ता आणि नगररचना काही प्रमाणात केंद्र व राज्य सरकारकडून येणाऱ्या मिळकतीवर मर्यादा आल्याने नवी मुंबई पालिकेची

| February 17, 2015 06:33 am

एलबीटी, मालमत्ता आणि नगररचना काही प्रमाणात केंद्र व राज्य सरकारकडून येणाऱ्या मिळकतीवर मर्यादा आल्याने नवी मुंबई पालिकेची होणारी कोटीच्या कोटी उड्डाणे स्थगित झाली आहेत.  दरवर्षी हवेत उडणारे अर्थसंकल्पीय विमान या वर्षी जमिनीवरच राहिले आहे. त्यामुळे पालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी नवीन प्रकल्प हाती न घेता जुनी नागरी कामे तडीस नेण्याचा संकल्प सोडला आहे. त्यामुळे एप्रिलमध्ये येणाऱ्या नवीन नगरसेवकांना किमान एक वर्ष तरी हाताची घडी तोंडावर बोट ठेवून वावरावे लागणार आहे.
नवी मुंबई पालिकेने गेल्या दहा वर्षांत सुमारे १५ हजार कोटींची नागरी कामे केलेली आहेत. यात काही कामांचा वाजवीपेक्षा जास्त खर्च झाला आहे. त्यांची चौकशी करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळेच स्थानिक लेखापरीक्षकांनी ३५४ आक्षेप घेतले आहेत. त्यातील केवळ ३२ आक्षेपांचे निराकारण करण्यात आले आहे. महालेखापालांचे देखील ३३ आक्षेप अद्याप कायम आहेत. त्यामुळे चांगभले करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या डोक्यावर टांगती तलवार आहे. मागील काही वर्षांत लॅण्डमार्क वगैरे बिरुदावली लावणारे, पण सर्वसामान्यांना आपलेसे न वाटणारे दोनशे कोटीचे मुख्यालय, वंडर होण्याऐवजी थंडर झालेले नेरुळ येथील उद्यान, संशयाच्या जाळ्यात असलेली मल व जलवाहिन्यांची एक हजार कोटींची कामे, नागरी कामांपेक्षा मोरबे येथे सौरऊर्जेसाठी खर्च करण्यात येणारे दोनशे कोटी, सिमेंट क्राँक्रिटीकरणाची साखळी, काही स्कायवॉकवरील अवास्तव खर्च, उद्यानांच्या सुशोभीकरणाखाली झालेला मातीचा घोटाळा, अशा अनेक प्रकल्पांवर वास्तववादी खर्चापेक्षा अवास्तव खर्च करण्यात आलेला आहे. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीत खडखडाट होण्याची वेळ आली आहे.
भविष्यात कंत्राटदार व कामगार यांनी देण्यास पालिकेकडे निधी शिल्लक राहणार नाही, अशी स्थिती आहे. त्यात एलबीटीतून करोडो रुपयांची दाखविण्यात आलेली स्वप्ने कधी प्रत्यक्षात उतरलेली नाहीत. त्यामुळे एलबीटी आणि मालमत्ता विभागाच्या बुडाशी लपलेला भ्रष्टाचार दिसून येत आहे. ८५० कोटी जमा करण्याचे आमिष दाखवून केवळ ५५० कोटी देण्याची किमया एलबीटी विभागाने केली आहे. त्यामुळे शिल्लक ३०० कोटी रुपये का जमा होत नाहीत, असा प्रश्न विचारण्याची हिंमत एकाही आयुक्ताने दाखविली नाही. त्यामुळेच उपकर विभागात काम केलेल्या एका अधिकाऱ्याची लाचलुचपत विभागाकडून चौकशी सुरू आहे. मालमत्ता कर विभागाचाही तोच पराक्रम गेली कित्येक वर्षे सुरू आहे, पण या विभागांना धारेवर धरणार कोण, असा प्रश्न जनतेला पडला आहे. यात ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’चे तंत्र वापरले जात आहे. गेली पाच वर्षे नवी मुंबईतील बांधकाम थंडावले आहे. ते अडीच एफएसआयमुळे पुन्हा जोमात सुरू होणार असल्याने त्यातून या वर्षीची १०० कोटींची कमाई होणार असल्याचे प्रशासनाचे मत आहे. त्यामुळे या तीन प्रमुख उत्पन्नातून १४०० कोटींची अपेक्षा आहे, पण एलबीटी रद्द झाल्यास पालिकेची स्थिती बिकट होणार आहे. त्यामुळे पालिकेचे हवेत घिरटय़ा घालणारे अर्थसंकल्पीय विमान या वर्षी जमिनीवर आले आहे. याची जाणीव खरगपूरमधून आयआयटी केलेल्या आयुक्तांना झाली आहे. त्यामुळे हातातील कामे हातावेगळी करण्याचे आदेश त्यांनी सर्व विभागांना दिली आहेत. त्यामुळे किमान एक वर्ष नवीन प्रकल्पाला हात घालणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी या पाच वर्षांत आपल्या प्रभागातील सर्व कामे काढून चांगभले करून घेतले आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तर नागरी कामांच्या शुभारंभाचा बार उडविण्यात आला होता. सध्या नवीन आयुक्त ताक फुंकून पीत असल्याने हा बार काहीसा गार झाला आहे. तरीही काही नगरसेवकांनी नागरी कामांची उद्घाटने करून घेतली आहेत. त्यामुळे नव्याने येणाऱ्या नगरसेवकांना किमान एक-दोन वर्षे जुन्या कामांवर रेघोटय़ा मारण्याशिवाय दुसरे काम राहणार नाही. कारण पालिकेच्या तिजोरीत येणारे १८६६ कोटी रुपये केवळ ५४ लाख रुपये शिल्लक ठेवून खर्च केले जाणार आहेत. यात मागील काही वर्षांपासून एका नियोजित कामाचा निधी दुसरीकडे वळविण्याचे प्रकार जोरात सुरू झाले आहेत. त्यामुळे दोनशे कोटींच्या मुख्यालयावर आर्थिक मंदीचे ढग घिरटय़ा घालत असल्याचे दृश्य येत्या काळात दिसून येणार आहे.  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2015 6:33 am

Web Title: the municipal headquarters will face money problem
Next Stories
1 कामोठेत एनएमएमटीविरोधात रिक्षाचालकांचे चक्काजाम
2 नवी मुंबईत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार
3 शिवसेनेच्या प्रचारासाठी बांदेकरांनी खेळ मांडियेला
Just Now!
X