आज अचानक हिरव्या पट्टय़ा अंगावर रंगवून घेतलेला मी बोरिवली स्टेशनात उभा आहे. ९.०९च्या गाडीला जोडलेल्या मला १०.०६ पर्यंत चर्चगेट गाठायचं आहे. काय म्हणतात हे लोक मला.. ‘कंपार्टमेंट’.. आणि ज्याला मी जोडलोय ती म्हणे लोकल. तिला आम्ही पळवतो की ती आम्हाला असा कधीकधी प्रश्न पडतो. ‘तिला’ जोडलेला असलो तरी कालपरवापर्यंत मित्रमंडळीमध्ये असल्यासारखं वाटायचं. कोणत्याही रंगाच्या पट्टय़ा अंगावर वागवत नव्हतो ना तेव्हाचं सांगतोय. ‘जनरल’ असलो तरी अघोषित असा ‘पुरुषी’ डब्बाच होतो मी. हे ‘राखीव’पणाचं ओझं नव्हतं अंगावर. रंग लागला अंगाला तसा सगळा नूरच बदलून गेला. आता पाहा ना बाया तरी किती-किती येताहेत? जागा नाही श्वास घ्यायला. त्यांच्या पर्सा, जेवणाचे डबे, हातातल्या पिशव्या काढल्या तरी त्यांना आणि मलाही मोकळंमोकळं वाटेल. काय काय पण भरलेलं असतं त्यात.. डबा, पाणी, मेकअपचं सामान, वर्तमानपत्र आणि पुस्तकही.. लोकलमध्येच तेवढंच अवांतर वाचन.
सकाळी नऊच्या सुमारास निघणारी ही गर्दी चर्चगेटला रिकामी करायची, आणि संध्याकाळी ऑफिस सुटलं की पुन्हा हीच फुटणारी गर्दी भरून परत आणायची. विचारानंच श्वास कोंडायला लागला. या बायांचा कसा कोंडत नाही? कोंडेल कसा?.. त्यासाठी आधी मोकळेपणाने श्वास घ्यावा लागतो! घरी जाताना डब्यातच भाजी निवडायची. मैत्रिणींचाही हातभार लागतो. प्रवासाचा वेळ कारणी लागतोच शिवाय वाचलेला वेळ घरच्या इतर कामाला देता येतो. कॅल्क्युलेशन्स तरी किती? स्टेशनपासून बसस्टॉप, रिक्षास्टॅण्ड गाठेपर्यंत दुसऱ्या दिवशीची भाजी, मुलाच्या शाळेत लागणारं प्रोजेक्टचं सामान, नवऱ्याच्या दाढीचा ब्रश, उशाची कव्हरं काहीही सामान पिशवीत गेलेलं असतं. साराच भार आपल्या डोक्यावर घेऊन कशा धावतात या?
डब्यातली कुणीतरी शेजारणीला सांगत होती की नवऱ्याच्या आणि मुलाच्या ‘आतल्या’ कपडय़ांची खरेदीही म्हणे तिलाच करावी लागते. इतके लाड?  इथं जोडला गेल्यापासून त्या ‘पुरुषी’ डब्यातल्या रुबाबाचं गुपित समजू लागलंय. तिथल्या शर्टावर साधी चुणीही कशी नसते हे कळू लागलंय.. पण यांच्या तोंडाचा पट्टा आणि तक्रारीही फार.. कुणाच्या सासूबाई साधी भाजीही निवडून ठेवत नाहीत.. नवरा आपल्यानंतर कामावरून घरी आल्यावर त्याला चहा द्यायचा, हसतमुखानं.. तो म्हणे दमलेला असतो. हे सासूबाईंचं म्हणणं.. उगीच वाद नकोत, म्हणून ऐकायचं.. मुलांचा अभ्यास, शाळेतले प्रोजेक्ट, सारं आयांच्याच गळ्यात.. एक तर म्हणत होती, मुलीच्या जन्मानंतर गेल्या पाच वर्षांत आम्ही ‘दोघं’ कुठे बाहेर गेलो नाही, साधा सिनेमाही पाहिला नाही एकत्र.
डोकी तर यांची भन्नाटच दुखतात. बाम असतोच पर्सचं ओझं वाढवायला अनेकींकडे. आता तर ऊठसूठ गोळ्या घेण्याचं प्रमाणही वाढलंय. हे प्रकार ११.१०च्या गाडीत फारच. या बहुधा मुलीच. महागडी घडय़ाळं, ब्रँडेड कपडे, पर्सेस, शूज, बोटांमधून लकलकत्या अंगठय़ा असा यांचा रुबाब. अनेकींच्या हातात पर्सबरोबरच लॅपटॉपचंही धूड. इतक्याशा जागेतही यांची बोटं त्यावर काहीतरी बडवत असतात. कानात हेडफोन्स. आजकाल फोन, व्हॉट्सअॅपवरही त्यांची ऑफिसचीच कामं चाललेली. ऑफिसला जायची वेळ ठरलेली पण परतण्याची नाही. सकाळी टापटीप दिसणारी शरीरं संध्याकाळी (नव्हे रात्रीच) पाहावी तर पेंगुळलेलीच. काहीजणी तर सकाळची राहून गेलेली झोपही इथंच काढतात.
पण एक खरं.. एकमेकींचं दमणंसुद्धा त्या हलकं करतात.. गर्दीत, गडबडीत कोण कुठे चढलं याकडे पक्कं लक्ष. एखादी कुणी बोरीवलीपासून उभी दिसली, तर तिला अंधेरीला चढलेल्या बाईच्या आधी जागा करून देतील. एखादी पोटुशी आली तर तिला या फुटणाऱ्या गर्दीतही सहज जागा मिळते. आठव्या-नवव्या महिन्यातही बाया बिनदिक्कत कामावर जातात त्या याच अनोळखी चेहऱ्यातल्या ओळखीच्या मैत्रीवर विसंबून तर नव्हे? अशा बायकांना दोन-दोन ‘ओझी’ सांभाळून डब्यात चढताना पाहून मलाच भीती वाटते. पण, त्या वरवर तरी मजेतच असतात. कारण, एव्हाना मनात भीती दाटून आलेली असते. आपल्या मैत्रिणींचे अनुभव असतात गाठीला. उद्या मूल झालं तर घर आणि ऑफिस रेटून न्यायचं तरी कसं? तेव्हा बसायला जागा मिळाली नाही तरी चालेल. पण, हीच ९.०९चीच लोकल मिळेल? विचारांचं काहूर माजलेलं असतं. असो.. कारण, ‘हिरव्या’ रंगाबरोबर येणारं हे प्राक्तन त्यांना भोगायलाच हवं. की या जन्मोजन्मीच्या प्राक्तनामुळंच ‘हिरवेपण’ मिळतं? आताशा मलाही या हिरवेपणाचं ओझं वाटेनासं झालंय. ओझं कशाचं बाळगायचं. कारण, सगळ्यांना वाटत असलं तरी मी थोडीच धावतोय हे ओझं घेऊन? पळतेय तर खरी तीच.. माझ्यासारख्या अनेकांना जोडून ठेवून.. मी फक्त काळजी घेतोय.. तिच्या सोबत असण्याची.. कारण तिला वेग गाठण्यासाठी तेही पुरेसं आहे!