छत्रपती शिवाजी शासकीय सर्वोपचार रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या एका महिलेला दाखल करताना तेथील डॉक्टराने असंवेदनशीलता दाखविली तर त्याचवेळी एका पोलीस अधिकाऱ्यातील ‘माणूस’ जागा होऊन कायदा हातात घेत त्याने संबंधित डॉक्टरला केलेली मारहाण व त्यातून डॉक्टरांच्या विरोधात उसळलेला जनक्षोभ गेल्या तीन दिवसांपासून डॉक्टर-जनता यांच्यात असा थेट संघर्ष होताना पाहावयास मिळत आहे. यात शासकीय रुग्णालय तथा डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील गेल्या सात-आठ वर्षांपासून बोकाळलेल्या अव्यवस्थेच्या विरोधात जनतेच्या सुप्त संताप उफाळून आला आहे.
यानिमित्ताने कितीही अन्याय झाला तरी एरव्ही नेहमीच सहनशील असणारे सोलापूरकर कधी नव्हे तेवढे संवेदनशील बनले आहेत. ही संवेदनशीलता अन्य प्रश्नांवर प्रकट होणार काय, असा सवाल उपस्थित झाला आहे. ४० वर्षांपूर्वी सोलापूरचे हेच वैद्यकीय महाविद्यालय राज्य शासनाने ताब्यात घ्यावे म्हणून डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांचे आंदोलन झाले असता शासनाच्या म्हणजे रस्त्यावरील पोलिसांच्या विरोधात जनतेने डॉक्टर व वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या बाजूने स्वयंस्फूर्तपणेआंदोलनात भाग घेतला होता. परंतु आता कित्येक वर्षांनंतर जनक्षोभ उसळला तो डॉक्टरांच्या बाजूने व पोलिसांच्या बाजूने, हा विचित्र योगायोग म्हणावा लागेल.
गेल्या ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीनंतर शासकीय रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या एका महिलेला दाखल करून घेताना विलंब झाला. तेव्हा ही महिला रुग्णालयाच्या इमारतीबाहेरच प्रसूत झाली. त्यावेळी फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरूण वायकर हे एका अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी आले होते. प्रसूतीसाठी आलेल्या महिलेच्या संदर्भात तेथील डॉक्टराने दाखविलेली असंवेदनशीलता पाहून वायकर हे भडकले. त्यांच्यातील ‘माणूस’ जागा झाला व त्यांनी कायदा हातात घेत त्या डॉक्टरची धुलाई केली. रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा मारहाणीचा प्रकार बंदिस्त झाला. या घटनेमुळे निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने लगेचच कामबंद पुकारून पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाईची मागणी केली. मार्डने संपूर्ण राज्यात कामबंद आंदोलन केल्यामुळे अखेर संबंधित पोलीस अधिकाऱ्याविरूध्द गुन्हा दाखल होऊन त्यास निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागले.
तथापि, या प्रश्नावर सामान्य जनतेमध्ये शासकीय रुग्णालयातील निवासी डॉक्टरांसह तेथील संपूर्ण प्रशासनाच्याविरोधात असंतोष पुढे आला असून यात विविध सामाजिक, राजकीय संघटना, लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या समर्थनार्थ व निवासी डॉक्टरांच्या विरोधात आंदोलन हाती घेतले आहे. सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादीनेही निवासी डॉक्टर व वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.अशोक शिंदे यांच्या विरोधात आंदोलन केले. सत्ताधारी मंडळी आंदोलनात उतरल्यानंतर शिवसेना व अन्य विरोधक मागे राहणे शक्य नव्हते. शुक्रवारी दुपारी शिवसैनिकांनी वैद्यकीय महाविद्यालयात अधिष्ठाता डॉ. शिंदे यांच्या दालनात घुसून त्यांना धक्काबुक्की केली. यावेळी केवळ डॉ. शिंदे हे त्यांच्या पत्नी डॉ. मंगल शिंदे यांच्यामुळे बचावले. गंमत म्हणजे सहायक पोलीस आयुक्तांच्या देखत हा प्रकार घडला. पोलिसांनी कोणाही आंदोलकाला अटक केली नाही.  गेल्या तीन दिवसांपासून अधिष्ठाता डॉ. शिंदे यांना अशा प्रसंगांना सामोरे जावे लागत आहे.
डॉ. शिंदे तब्बल साडेसात वर्षांपासून डॉ. वैशंपायन स्मृती वैद्यकीय महाविद्यालयात अधिष्ठातापदावर चिकटून बसले आहेत. त्यांचे प्रशासनावर नियंत्रण नाही. ७३३ खाटांच्या शासकीय रुग्णालयातील अनागोंदी माजली असून कोणाचा पायपोस कोणात राहिला नाही. दोन वर्षांपूर्वी शहरात दूषित पाण्यातून कॉलरा व गॅस्ट्रोच्या साथीमुळे तब्बल २१ जणांचे बळी गेले होते. त्यावेळी वैद्यकीय सेवेविषयीची अनास्था दिसून आल्यामुळे अधिष्ठाता डॉ. शिंदे यांची बदलीच नव्हे तर त्यांना निलंबित करण्याचे ठरले होते. परंतु कोणतीही कारवाई होता, सोलापूरचे वैद्यकीय महाविद्यालय जणू आंदण दिल्याप्रमाणे ते अथिष्ठातापदावर कायम आहेत. एकंदरीत त्यांच्या विरुध्दचा रोष आता बाहेर प्रकटला आहे.