20 February 2019

News Flash

पोलिसांकडून छळ होणाऱ्या महिलेला लोकप्रतिनिधींची साथ

नवरा व सासरच्या छळाविरोधात पोलिसांकडे मदतीसाठी धाव घेणाऱ्या महिला डॉ. प्रज्ञा यांची पोलिसांकडूनच छळवणूक झाल्याचे उघड झाल्यानंतर वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी डॉ. प्रज्ञा यांच्या मदतीसाठी

| August 26, 2015 12:32 pm

नवरा व सासरच्या छळाविरोधात पोलिसांकडे मदतीसाठी धाव घेणाऱ्या महिला डॉ. प्रज्ञा यांची पोलिसांकडूनच छळवणूक झाल्याचे उघड झाल्यानंतर वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी डॉ. प्रज्ञा यांच्या मदतीसाठी सरसावले आहेत. मुंबईसारख्या शहरात पोलीस आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावर जर महिला पोलिसांकडूनच छळ होत असेल तर पोलीस आयुक्तांचा धाक नेमका आहे कोणाला, असा सवाल आमदारांकडून करण्यात आला आहे. सदर महिला डॉक्टरला न्याय मिळावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच आमदारांनी आवाहन केले.
सासरकडून गर्भवती असताना झालेला छळ तसेच मुलीच्या जन्मानंतरही नवरा असलेल्या विशाल ओंबळे याच्याकडून होणाऱ्या जाचाविरोधात रफी अहमद किडवाई मार्ग पोलीस ठाण्यात डॉ. प्रज्ञा व तिचे वडील गुन्हा दाखल करावा यासाठी अनेकदा गेल्या. येथील महिला पोलीस अधिकारी वैशाली गांडुर्डे यांनी तासन्तास बसवून ठेवले. एवढेच नव्हे तर एफआयआरमध्ये त्रुटी ठेवल्याची तक्रार डॉ. प्रज्ञा यांनी केली. एवढेच नव्हे सासरच्यांना जामीन मिळावा यासाठी प्रज्ञा यांना त्यांचे स्त्री धन जबरदस्तीने घेण्यास भाग पाडले. याची माहिती उपायुक्त दुधे यांच्यासमोर डॉ. प्रज्ञा यांनी मांडल्यानंतर संबंधित महिला पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश दुधे यांनी जारी केले तसेच तिला सर्व प्रकारे मदत करण्याचे आश्वासन दिले.याबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर भाजपचे आमदार योगेश सागर तसेच राष्ट्रवादीचे आमदार किरण पावसकर व राजेंद्र पटणी यांनी डॉ. प्रज्ञा यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली तसेच तात्काळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून कठोर कारवाई करण्याची मागणी केली. जेट एअरवेजमध्ये कामगार संघटनेचे नेते असलेल्या आमदार पावसकर यांनी जेटच्या व्यवस्थापनाला पत्र पाठवून अभियंता असलेल्या विशाल ओेंबळे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.व्यवस्थापनानेही तात्काळ दखल घेऊन त्यांच्या यंत्रणेमार्फत चौकशी सुरू केली असून त्याबाबतचे पत्र ‘लोकसत्ता’कडे आहे. महिलांच्या होणाऱ्या छळाबाबत पोलिसांकडून दाखविण्यात येणाऱ्या बेपर्वाईने एका मुलीने नुकतीच आत्महत्या केली तर अनेकदा पोलिसांकडून साहाय्य नसल्यामुळे अन्याय सहन करण्यापलीकडे महिलांच्या हाती काही राहात नाही. मुंबईतच एका उच्चविद्याविभूषित डॉक्टर महिलेचा गर्भवती असताना पोलीस ठाण्यात होणारा छळ ही गंभीर बाब असून पोलीस आयुक्त व अतिरिक्त आयुक्तांचा कोणताही धाक पोलिसांनाच उरलेला नसल्याचे यातून स्पष्ट होत असल्याचे भाजपचे आमदार योगेश सागर यांनी सांगितले.

First Published on August 26, 2015 12:32 pm

Web Title: the persecution of the police woman gives helping hand representatives
टॅग Persecution