News Flash

समाजाला प्रगतीकडे नेणारा खरा नेता : मालदार

आपण नेतृत्व करताना आपले कार्य सर्वाना विकासाच्या दिशेने नेणारे असावे, त्याचे गुण, रुम, कपडे यावरून त्याचे नेतृत्व ठरत नाही तर त्याचे कार्य कणखर निर्णय क्षमता

| January 30, 2013 08:05 am

आपण नेतृत्व करताना आपले कार्य सर्वाना विकासाच्या दिशेने नेणारे असावे, त्याचे गुण, रुम, कपडे यावरून त्याचे नेतृत्व ठरत नाही तर त्याचे कार्य कणखर निर्णय क्षमता यावरून त्याचे नेतृत्व यशस्वी होते. म्हणजेच समाजाला प्रगतीकडे नेणाराच खरा नेता असतो, असे प्रतिपादन सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार यांनी केले.
सोलापूर विद्यापीठ, सोलापूर व श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रीसर्च इन्स्टिटय़ूट संचलित इंजिनिअरींग कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने डिप्लोमा पॉलिटेक्नीकच्या सेमिनार हॉलमध्ये युवा नेतृत्व विकास शिबिराचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटक व प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष धनंजय सालविठ्ठल होते. प्रमुख पाहुण्यांचा परिचय, विद्यापीठांतर्गत असणाऱ्या सर्व महाविद्यालयांचे विद्यापीठ प्रतिनिधींचे स्वागत व संस्थेची १६ वर्षांची यशस्वी वाटचाल या महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या संस्थेचे संस्थापक सचिव व इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांनी पार पाडली.
पुढे बोलताना उद्घाटक कुलगुरू डॉ. मालदार म्हणाले, ‘स्वेरीची वाटचाल स्वप्नवत वाटते, परंतु सर्व ठिकाणी पाहिल्यावर या संस्थेत तळमळीने कार्य करणारी माणसं मिळतात. सोलापूर विद्यापीठ हे नवीन आहे. ते उत्तम प्रकारे कार्य करावे याकरिता सर्व महाविद्यालयांच्या सहकार्याची गरज आहे. यासाठी महाविद्यालयाने नेहमी तत्पर रहावे असे त्यांनी आवाहन केले. विद्यापीठ विद्यार्थी मंडळाचे सचिव डॉ. संजय नवले यांनी ‘महाविद्यालयातील विद्यार्थी केवळ पुस्तकी ज्ञान घेताना आणखी काही तत्त्वांची, विचारांची जोड असल्याशिवाय विकास अशक्य आहे.
त्याकरिता युवा नेतृत्व विकास शिबिराचे आयोजन केले आहे. न भूतो न भविष्यती असे युवा महोत्सव, अप्रतिम आविष्कार यांच्या उत्कृष्ट कार्यामुळेच युवा नेतृत्व विकास शिबिर या ठिकाणी घेण्याचे ठरले. असे सांगून पंचा नेसणारा नेतृत्व करू शकतो. यावरून चांगल्या कपडय़ावरून, उत्कृष्ट दिसण्यावरून नव्हे तर भरीव व प्रामाणिक कार्यामुळेच नेतृत्व यशस्वी होते. असे सांगितले. अध्यक्षस्थानावरून बोलताना संस्थेचे अध्यक्ष धनंजय सालविठ्ठल यांनी, लोणचे आंबा, केशर आंबा व मधाळ आंबा अशा प्रकारेच नेतृत्वाचे देखील तीन प्रकार असून मधाळ आंब्याप्रमाणे कच्चा असताना, पाडाला असताना व संपूर्ण पिकल्यानंतर तीनही प्रकारात उत्कृष्ट चव दाखवितो त्याप्रमाणे नेतृत्व गुण असले पाहिजे. प्रचंड वादळातदेखील मुळे खोलवर असल्याने वटवृक्षाला काहीच होत नाही त्याप्रमाणे कणखर नेतृत्व असावे. असे मत मांडले.
यावेळी प्रा. शाम आगळे, डॉ. एन. बी. पवार, विद्यार्थी मंडळाचे सचिव मनोज अधटराव, विद्यार्थी मंडळाच्या अध्यक्षा रूपाली जाधव, संयोजन समितीचे प्रा. सचिव गवळी, प्रा. एस. एम. शिंदे, सोलापूर विद्यापीठ अंतर्गत असणारे महाविद्यालयातील विद्यापीठ प्रतिनिधी, प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. यशपाल खेडकर तर आभार विद्यापीठ प्रतिनिधी सुनिल भिंगारे यांनी मानले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2013 8:05 am

Web Title: the person who takes the society towards development is nobody but the leader maldar
Next Stories
1 आधारकार्ड’मधील गैरव्यवस्थेबाबत कोल्हापुरात भाजपचे निवेदन
2 सुरेश शिवगोंडा पाटील यांचे अपघाती निधन
3 इचलकरंजी नगरपालिकेची अतिक्रमण विरोधी मोहीम
Just Now!
X