नवी मुंबई महानगरपालिकेला एलबीटी बंद झाल्याने मोठी तूट सहन करावी लागत आहे. महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी विविध आस्थपनाकडे असणारी थकीत देयके वसूल करुन सध्या शहरात सुरु असणारी विकास कामे मार्गी लावून पालिकेची कमकुवत झालेली आर्थिक स्थिती सुधारणार असल्याचे पालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी विशेष महासभेच्या चर्चेअंती भूमिका मांडताना स्पष्ट केले.नवी मुंबई महानगरपालिकेचे उत्पन्नाचे स्त्रोत आणि पूर्तता करावयाच्या नागरी सुविधा यांचा ताळमेळ राखणे गरजेचे आहे. या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेने सोमवारी व मंगळवारी विशेष महासभा बोलवली होती. मंगळवारी सुमारे साडेआठ तास झालेली विशेष महासभा महापालिकेच्या इतिहासात महत्वपूर्ण ठरली. शहराचे नियोजन आणि आर्थिक स्त्रोत वाढविण्यासाठी सत्ताधाऱ्यांसह विरोधी सदस्यांनी आपल्या सूचना व विविध योजना प्रशासनाकडे मांडल्या.या सभेमध्ये सभागृह नेते जे.डी.सुतार, स्थायी समिती सभापती नेत्रा शिर्के, नगरसवेक रवींद्र इथापे,  रामचंद्र घरत,   द्वारकानाथ भोईर,  अपर्णा गवते, दिव्या गायकवाड, उज्वला झंजाड, गिरीश म्हात्रे, गणेश म्हात्रे,एम.के.मढवी, स्वीकृत सदस्य मनोज हळदणकर, अनंत सुतार  व सुरज पाटील आदींनी सभागृहात सूचना सादर केल्या.प्रशासनाकडून करावयाच्या उपाययोजना आणि खर्चाचा ताळमेळ कसा घालायचा यावर सभागृहात चर्चेदरम्यान सत्ताधारी व विरोधकांमध्ये शब्दीक चकमक उडाली. सभागृहात ८० टक्के नवे नगरसेवक असून त्यांना प्रशासकीय कामाकाजाचा आणि अंदाजपत्रकाचा आढावा घेता यावा यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आल्याचे महापौर सुधाकर सोनवणे यांनी स्पष्ट केले. नगरसेवकांनी मांडलेल्या सूचना आणि केंद्र व राज्य शासनाकडून मिळणार निधी यांची सांगड घालून महापालिकेची तिजोरी अधिक भक्कम करण्यासाठी नवनवीन योजनांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना महापौरांनी प्रशासनाला दिल्या.पालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी तब्बल दीड तास सदस्यांच्या विविध प्रष्टद्धr(२२४)्नाांना उत्तरे दिली. शहराच्या विकासासाठी सिडको, कोकण भवन, पोलीस खाते, एमआयडीसी यांच्याकडे असणारी कोटीची थकबाकी रक्कम वसूल करण्यासाठी प्रशासन पाठपुरावा करत असल्याचे सभागृहात सांगितले. पाणी पुरवठा, जाहिरात, फेरीवाला धोरण यांच्या माध्यामातून आर्थिक उत्पन्न मिळवण्यासाठी पालिकेने केलेल्या उपाययोजनांची माहिती आयुक्तांनी दिली. महापालिकेने एलबीटी बंद झाल्यांनतर १०० कोटीची थकीत असलेली वसुली मागील महिन्याभरात केल्याचे म्हणाले.लघु उद्योजकांकडून असणारी वसुली येत्या काही कालावधीत करुन पालिकेच्या आर्थिक स्थिती सुधारण्याचे सांगितले. वाढीव बांधकामामुळे मालमत्ता करात मोठी तूट होत असून अनाधिकृत बांधकामाचा येत्या दोन महिन्यात सर्वे करुन कर आकरणी करण्याचे सक्त आदेश प्रशासनाला दिले. वंडर्स पार्कच्या माध्यमातून निधी कसा मिळवता येईल. त्याचबरोबर बजेटमध्ये असणारी तूट भरुन काढून १०० टक्के वसूली कशी करता येईल यासाठी आयुक्तांनी केलेली उपाययोजनांची माहिती महासभेला देण्यात आली.

उत्पन्नासाठी शहराचा सर्वे करणार
नवी मुंबई महानगरपालिका परिक्षेत्रात सिडको आस्थपनामुळे महापालिकेला अनेक विकास कामात अडचणी निर्माण होत आहे. सिडकोने जमिनी फ्री होल्ड केल्यास नवी मुंबई महानगरपालिकेला आर्थिक उत्पादन मोठया प्रमाणावर मिळेल. असे सांगून त्याकरीता शहराचा सर्वे करणार असल्याचे पालिका आयुक्तांनी आपल्या धोरणात्मक निर्णयात सांगितले.
विरोधी पक्ष नेत्यांची दांडी
नवी मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी बोलवण्यात आलेल्या विशेष महासभेत विरोधी पक्ष नेते विजय चौगुले यांनी मंगळवारी दांडी मारली होती. त्यामुळे ऐरवी सभागृह डोक्यावर घेणारे आणि आम्हीच नागरिकांसाठी संतर्क असल्याचा गवगवा करणारया विरोधी पक्ष नेत्यांनी दांडी का मारली हा चच्रेत होता. पालिका आयुक्त सभागृहात आपली भुमिका मांडत असताना विरोधी पक्ष व सत्ताधाऱ्यांतील सदस्य बोटावर मोजण्या इतके उपस्थित होते. त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना किती आस्था आहे हे स्पष्ट झाले आहे.