एटीव्हीएम यंत्राच्या बाजूला प्रवाशांना तिकीट काढून देण्यासाठी असलेल्या मदतनीसांना रेल्वे बोर्डाच्या आदेशावरून हटवण्यात आल्यानंतर मध्य रेल्वेच्या एटीव्हीएमवरून विकल्या जाणाऱ्या तिकिटांमध्ये प्रचंड घट झाली आहे. जवळपास निम्म्यापेक्षा जास्त प्रवाशांनी एटीव्हीएमकडे पाठ फिरवली असून तिकीट खिडकीसमोरील रांगाही वाढल्या आहेत. त्यातच अनेक प्रवाशांनी विनातिकीट प्रवासाचा धोकादायक मार्ग पत्करल्याने मध्य रेल्वेच्या एटीव्हीएममधून मिळणाऱ्या उत्पन्नात तब्बल ६ कोटींची तूट पडली आहे. परिणामी रेल्वेला वार्षिक ७२ कोटी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
तिकीट खिडक्यांसमोरील भल्यामोठय़ा रांगा कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने प्रवाशांना विविध पर्याय उपलब्ध करून दिले. यातच एटीव्हीएम यंत्रे बसवण्यात आली. मात्र स्मार्टकार्डचा अभाव आणि हाताळण्यास किचकट एटीव्हीएम यामुळे प्रवाशांनी त्याकडे पाठ फिरवली होती. त्यानंतर मध्य रेल्वेने अनेक एटीव्हीएम यंत्रांच्या बाजूला फॅसिलिटेटर किंवा मदतनीस नियुक्त केले होते. हे मदतनीस रेल्वेचेच कर्मचारी किंवा निवृत्त कर्मचारी होते. मध्य रेल्वेमार्गावर असे ७०४ मदतनीस कार्यरत होते. मात्र जून महिन्यात रेल्वे बोर्डाने दिलेल्या आदेशांनुसार मध्य रेल्वेला हे मदतनीस काढून टाकावे लागल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य वाणिज्य व्यवस्थापक राजीव दत्त शर्मा यांनी सांगितले.
त्यानुसार २५ जूनपासून रेल्वेने आपल्या कर्मचाऱ्यांना मदतनीस म्हणून काम करण्यास मनाई केली. त्यामुळे या ७०४ मदतनीसांपैकी ६०६ मदतनीस कमी झाले. परिणामी लोकांना एटीव्हीएमद्वारे तिकिटे काढणे कठीण जाऊ लागले आणि ही रांग तिकीट खिडक्यांसमोर सुरू झाली.
मात्र तिकीट खिडक्यांवर आधीच रांगा असल्याने आता तिकीट काढण्यासाठी किमान १५ ते कमाल ४० मिनिटे एवढा कालावधी लागत आहे. परिणामी लोक अनेकदा नाईलाजाने विनातिकीट प्रवास करण्याचे धाडस करत आहेत.

एटीव्हीएमकडे लोकांनी पाठ फिरवल्यामुळे एटीव्हीएमच्या तिकीट विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नाला रेल्वेला मुकावे लागत आहे. हा आकडा गेल्या महिन्यापासून सुमारे चार कोटींवर पोहोचला आहे. तर एटीव्हीएमद्वारे तिकीट काढणाऱ्यांची संख्याही दुपटीने कमी झाली आहे. मदतनीसांवर बंदी आणल्यानंतरच्या पाच दिवसांत तर मध्य रेल्वेला प्रचंड तडाखा बसला. त्यानंतर मध्य रेल्वेने उमेदवारीसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना काही काळ मदतनीस म्हणून काम देऊ केले. तसेच निवृत्त कर्मचारी असलेल्या मदतनीसांची संख्याही वाढवली. त्यामुळे जुलै महिन्यात पुन्हा एकदा एटीव्हीएमचे उत्पन्न काही प्रमाणात वाढल्याचे शर्मा यांनी स्पष्ट केले.