‘फास्ट अ‍ॅण्ड फ्युरिअस ७’ या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता ड्वेन जॉन्सन ‘द रॉक’ची भारतात चर्चा झाली होती. हॉलीवूडच्या ‘फास्ट अ‍ॅण्ड फ्युरिअस’ चित्रपटाने आपल्याकडे तिकीटबारीवर १०० कोटींचा गल्ला जमवून महिनाही पूर्ण होत नाही तोपर्यंत ड्वेन जॉन्सनचा ‘सॅन अँड्रिआस’ हा आगामी हॉलीवूडपट खास हिंदीत डब करून इथे दाखवला जाणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ‘द रॉक’च्या चाहत्यांना त्याचे पुन्हा एकदा पडद्यावरच दर्शन होणार आहे. मला कधीही भारतात यायची संधी मिळालेली नाही. त्यामुळे त्या अर्थाने मी भारतात परततो आहे असे म्हणणे चुकीचे ठरेल, असे सांगणाऱ्या ड्वेनने लवकरच भारतभेटीवर येण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
‘फास्ट अ‍ॅण्ड फ्युरिअस ७’नंतर लगेचच ड्वेन जॉन्सनचा ‘सॅन अँड्रिआस’ हा चित्रपट इथे हिंदीत डब करून प्रदर्शित केला जाणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ‘द रॉक’चा चाहता असलेला अभिनेता वरुण धवन याने त्याला भारतभेटीवर येण्याविषयी विचारणा केली होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून वरुण धवन आणि ड्वेन जॉन्सन यांची ओळख झाली आणि त्यानंतर त्यांच्यात एक खास मैत्रीचे नाते निर्माण झाले आहे.
ड्वेनचा आगामी चित्रपट हा भूकंपाच्या वास्तवतेवर बेतलेला आहे. हा चित्रपट मे महिन्यातच प्रदर्शित होणार होता. मात्र, त्याआधीच नेपाळमध्ये भूकंप झाला. त्यामुळे आपल्या चित्रपटाची प्रसिद्धी करणे योग्य ठरणार नाही हे लक्षात घेऊन ‘सॅन अँड्रिआस’चे निर्माते वॉर्नर ब्रदर्सने त्यांचे सगळे प्रसिद्धी कार्यक्रम थांबवले होते.
‘सॅन अँड्रिआस’ या आठवडय़ात प्रदर्शित होत असून भारतात तो हिंदीतही डब करून प्रदर्शित केला जाणार आहे. मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रात सर्वच प्रमुख शहरांमधून ‘सॅन अँड्रिआस’ हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे.