नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदार संघासाठी अद्याप एकाही उमेदवाराकडून अर्ज दाखल झाला नसला तरी अर्ज नेणाऱ्यांची संख्या पाहता मतदान यंत्राची कमतरता भासेल की काय, अशी साशंकता जिल्हा निवडणूक यंत्रणेला वाटत आहे. उमेदवारी अर्ज माघारीची मुदत संपुष्टात आल्यानंतर प्रत्येक मतदारसंघातील अंतीम चित्र स्पष्ट होईल. परंतु, अपक्षांची संख्या अधिक राहिल्यास त्या दृष्टिने अतिरिक्त मतदान यंत्राची उपलब्धता करण्याची चाचपणी यंत्रणेने सुरू केली आहे.
नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदार संघासाठी अधिसूचना जारी झाल्यानंतर पहिल्या दिवशी एकाही उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. रविवार व सोमवार असे दोन दिवस सलग सुटी असल्याने आता मंगळवार ते शनिवार या कालावधीत अर्ज दाखल होतील. पहिल्या दिवशी अर्ज दाखल झाले नसले तरी अर्ज नेणाऱ्यांची संख्या लक्षणिय होती. या दिवशी नाशिक लोकसभा मतदार संघासाठी २७ जणांनी ४५ अर्ज तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी सात जणांनी २३ अर्ज नेले. त्यात काही प्रमुख राजकीय पक्षांसह कधी फारसे नांव न ऐकलेल्या अनेक छोटय़ा पक्षांच्याही नावाने अर्ज नेणाऱ्यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त मोठे प्रमाण आहे ते अपक्ष उमेदवारी अर्ज नेणाऱ्यांचे. एकटय़ा नाशिक लोकसभा मतदार संघासाठी १६ जणांनी अपक्ष म्हणून अर्ज नेले आहेत तर दिंडोरी मतदारसंघात हे प्रमाण तुलनेत कमी म्हणजे केवळ दोन आहे.
अर्ज नेणाऱ्यांचे प्रमाण अधिक असले तरी त्यातील किती जण तो दाखल करतात हा प्रश्न आहे. तथापि, बीड व राज्यातील इतर काही भागात अपक्षांच्या भाऊ गर्दीमुळे ऐनवेळी निर्माण झालेल्या तुटवडय़ाचा सामना करावा लागू नये म्हणून जिल्हा निवडणूक शाखा त्या दृष्टीने विचार सुरू केला आहे.
वास्तविक, यंदा लोकसभेच्या निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मतपत्रिकेवर उमेदवारांच्या नावाबरोबर ‘नोटा’ अर्थात ‘यापैकी कोणीही नाही’चा पर्याय समाविष्ट होणार आहे. मतदान यंत्राचे ‘बॅलेट युनिट’ व ‘कंट्रोल युनिट’ असे दोन भाग असतात. जिल्ह्यात निवडणुकीसाठी सद्यस्थितीत ४६१० कंट्रोल युनिट तर ४६१० बॅलेट युनिट उपलब्ध आहेत. त्यातील ४०० यंत्र ही निव्वळ कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी वापरले जातील, असे निवडणूक यंत्रणेने सूचित केले आहे. म्हणजे प्रत्यक्ष मतदानासाठी ४२१० कंट्रोल युनिट व तितक्याच प्रमाणात बॅलेट युनिट उपलब्ध राहतील.
एका बॅलेट युनिटवर १६ उमेदवारांची नावे समाविष्ट होतात. यंदा त्यात ‘नोटा’चा पर्याय समाविष्ट होणार असल्याने केवळ १५ नावे एका बॅलेट युनिटवर समाविष्ट करता येतील. त्यामुळे कोणत्याही मतदार संघात उमेदवारांची संख्या १५ हून अधिक झाल्यास अतिरिक्त बॅलेट युनिटची उपलब्धता करणे क्रमप्राप्त ठरणार आहे. नाशिक मतदार संघासाठी अर्ज नेणाऱ्यांची संख्या पहिल्याच दिवशी २७ वर पोहोचल्याने यंत्रणेला या मुद्याचे महत्व लक्षात आले. अर्ज दाखल करण्यास शनिवार पर्यंतचा अवधी असून त्यानंतर ९ एप्रिलपर्यत माघारीची मुदत आहे. या मुदतीनंतर खरे चित्र स्पष्ट होईल. परंतु, उमेदवारांची संख्या मोठी राहिल्यास अतिरिक्त बॅलेट युनिटची पूर्तता करण्याचे आव्हान यंत्रणेसमोर राहू शकते.