पावसाळा सुरू होताना मुंबईत अनेक ठिकाणी साप दिसल्याच्या, पकडल्याच्या, सार्पदंशाच्या घटना घडतात. मात्र, सध्या सुरू मध्येच ऊन, हलकासा पाऊस, ढगाळ वातावरण तर मध्येच थंडीची लहर अशा विचित्र हवामानामुळे जमिनीखाली राहणारे हे शीतरक्ताचे जीव पुन्हा एकदा अधिक संख्येने शहरात दिसू लागले आहेत. मुंबईतील इंच न इंच जागेवर माणसाने कब्जा करायला घेतला असला तरी अजूनही अनेक जीवजंतू स्वतचे अस्तित्व टिकवून आहेत. गजबजलेल्या दक्षिण मुंबईतही मधूनच दर्शन देणारे साप हे त्यापकीच एक. एखाद्या कपारीत, बिळात वास्तव्य करून सहसा कोणाच्या दृष्टीस न पडण्याची खबरदारी घेणारे हे प्राणी सध्या मात्र दिवसाढवळ्याही दिसत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणांहून सर्पमित्रांना बोलावण्यासाठी फोन वाजू लागले आहेत. पवई तलावाच्या बाजूला असलेल्या जॉिगग ट्रॅकमध्ये हिरवा घोणस (चापडा) हा विषारी साप दिसल्याचे समजल्यावर प्लॅण्ट अ‍ॅण्ड अ‍ॅनिमल वेल्फेअर सोसायटीच्या (पीएडब्ल्यूएस) कार्यकर्त्यांनी या snake01सापाला पकडून जंगलात सोडून दिले. गेल्या काही दिवसात सतत बदलत असलेल्या हवामानामुळे अनेक ठिकाणांहून साप दिसल्याचे फोन येत आहेत. पवई ते मुलुंड परिसरातून तीन नाग, एक घोणस व एक बिनविषारी धामण पकडून जंगलात सोडून देण्यात आले, असे पीएडब्ल्यूएसचे सुनीष कुंजू यांनी सांगितले.  मुंबईत अनेक ठिकाणी सिंमेट क्राँक्रिटची जंगलेच उभी राहिली असली तरी पडीक कारखाने, गिरण्या, खाडीलगतच्या पाणथळ जमिनी, काही ठिकाणी उरलेली हिरवी बेटं याठिकाणी अजूनही साप वास्तव्य करून आहेत. यातील बहुतांश साप हे बिनविषारी असून त्यांना डिवचल्याशिवाय ते दंश करत नाहीत. त्यामुळे साप दिसल्यास त्याला न मारता सर्पमित्रांना बोलावण्याचे आवाहन पर्यावरणप्रेमींनी केले आहे.

साप हे शीतरक्ताचे असतात. माणसाप्रमाणे त्यांच्या शरीरात तापमान नियंत्रित करणाऱ्या ग्रंथी नसतात. त्यामुळे वातावरणात झालेल्या बदलामुळेही त्यांना शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी धडपडावे लागते, जागा बदलावी लागते. पावसाळ्याच्या सुरुवातीला साप निवारा शोधण्यासाठी बाहेर पडतात. तसेच ऑक्टोबर हीट व त्यानंतर सुरू होणारा हिवाळा या काळातही हे प्राणी अनेक ठिकाणी दिसतात, तापमान वाढल्यास थंड ठिकाणी म्हणजे एखाद्या बंदिस्त ठिकाणी तर थंडी वाढल्यास तुलनेने उबदार निवारयाच्या शोधात असताना साप दिसतात.
निखिल भोपळे, सर्पतज्ज्ञ