लब्ध प्रतिष्ठितांच्या लॉयन्स क्लबला मान्यवरांचे पाय लागले अन् या मान्यवरांनी याचवेळी आर्थिक मदतीचा हात पुढे केल्याने प्रतिष्ठितांच्या चेहऱ्यावरील हास्य अधिकच विस्तारले. स्वयंसेवी संस्थांना मान्यवर दानशूरांकडून मदतीची नेहमीच आस असते. खरीखुरी समाजसेवा करणाऱ्यांनी हे दान सत्कर्मी लागावे म्हणून केलेले प्रामाणिक प्रयत्न नेहमी कौतुकास पात्रही ठरतात. परंतु, पदरच्या अतिरिक्त पैशातून समाजसेवेची हौस भागविणाऱ्या संस्था सर्वपरिचित आहेत. त्यांनाही मदतीचा हात मिळाल्यास सोने पे सुहागा अशीच भावना त्यांची व्हावी.
वर्धा लॉयन्स क्लबच्या पदग्रहण समारंभात आमदार प्रा. सुरेश देशमुख व माजी आमदार तसेच लोकसभा निवडणुकीचे संभाव्य उमेदवार सागर मेघेंची उपस्थिती लागली. आयोजक पदाधिकारी कृतकृत्य झाले. संघटनेच्या कामासाठी सर्व ती मदत करण्यासोबतच विशेष उपक्रमासाठी आमदार निधीतून मदत करण्याची हमी आमदार देशमुखांनी दिली, तर संघटना पदाधिकाऱ्यांसाठी आपले दार सदैव मोकळे असल्याची ग्वाही सागर मेघेंनी दिली. विलसत्या हास्यासह संघटनेच्या प्रतिष्ठितांनी टाळयांची कडकडून दाद दिली. भरून पावल्याची भावना यावेळी पदाधिकाऱ्यांमध्ये दिसून आली.
नवनियुक्त अध्यक्ष रंजना दाते तसेच नौशाद बक्श, शशांक बानाईत, महेश भाटिया, अभिषेक बेद, डॉ. माधुरी वाणे, रितूराज चुडीवाले, प्रदीप पशिने, मुस्तफो सैफी, जयेश चव्हाण, डॉ. सारंग गोडे, विलास जोशी, चंद्रशेखर इंगोले, डॉ.अजय वाणे, पी.पी. देशमुख, प्रदीप दाते यांना प्रांतपाल चंद्रकांत सोनटक्के यांनी पदाची शपथ दिली. संघटनेचे गोविंद चुरा, पुष्पा मोहोड, डॉ. विनोद अदलखिया, भागचंद बजाज यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. नवनियुक्त अध्यक्ष रंजना दाते यांनी पाहुण्यांच्या विश्वासास पात्र ठरण्याची खात्री दिली. शुभदा रूद्रकार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. देशमुख-मेघे संस्था समूहातर्फे मिळणारी मदत हेच या कार्यक्रमाचे संचित ठरले.