शत्रूच्या गोळ्या छातीवर झेलत सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांच्या पाल्यांसाठी अन्य विभागांच्या तुलनेत नागपूर विभागात कमी वसतिगृहे उपलब्ध असल्याने त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. वसतिगृहांच्या कमतरतेमुळे सैनिकांच्या अनेक मुलांना वसतिगृहात प्रवेश मिळत नाही किंवा प्रतीक्षा यादीवर ताटकळत राहावे लागत. यावेळच्या शैक्षणिक सत्रातही अशीच परिस्थिती निर्माण झाली असून नागपूर विभागात मुलांच्या वसतिगृहांची संख्या वाढवण्याची नितांत आवश्यकता आहे.
राज्याच्या सैनिक कल्याण विभागांतर्गत नागपुरातील सैनिकांच्या पाल्यांसाठी वसतिगृह चालवले जाते. सैनिकांच्या मुलींच्या शिक्षणासाठी सुरक्षेच्या उद्देशाने १९९३ साली आणि मुलांसाठी २००३ साली वसतिगृह उभारण्यात आले. कारगिल युद्धानंतर स्थानिक वृत्तपत्रांनी उभारलेल्या निधीतून वसतिगृहाचे बांधकाम करण्यात आले होते. मात्र, गेल्या दहा वर्षांंपासून या दोन वसतिगृहांच्या व्यतिरिक्त एकाही वसतिगृहाची भर पडू शकली नाही. त्यामुळे नागपूर विभागातील सहा जिल्ह्य़ांमधील सैनिकांच्या पाल्यांना नागपुरातील वसतिगृहांवरच अवलंबून राहावे लागत आहे. साहजिकच सर्वानाच शहरात राहून शिक्षण घेणे शक्य होत नाही. खास करून मुलींच्या शिक्षणाला मर्यादा येत आहेत.
तुलनेने कोकण विभाग, पुणे विभाग, नाशिक विभाग, औरंगाबाद विभाग, अमरावती विभागांमध्ये सैनिकांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी वसतिगृहे वाढवून विशेष काळजी घेण्यात आली आहे. कोकण विभागात मुंबई उपनगरात मालवणी येथे ६५ मुलांची क्षमता असलेले तर कलिना येथे ८६ मुलींची क्षमता असलेले वसतिगृह आहे. ठाण्यात आणि रायगडमधील महाड येथे अनुक्रमे ५४ आणि ३२ मुलांसाठी वसतिगृह आहे. रत्नागिरीतील चिपळूणमध्ये मुले आणि मुलींसाठी प्रत्येकी ४० क्षमता आहे तर खेडमध्ये ४० मुलांसाठी सोय आहे. पुणे विभागात सैनिकांची संख्या जास्त असल्याने वसतिगृहांची संख्याही जास्त आहे. पुण्यातील घोरपडी भागात १७२ मुलांसाठी आणि ९६ मुलींसाठी वसतिगृहाची सोय आहे.
पुणे सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्य़ांतील पुणे(घोरपडी), सातारा, कराड, पाटण, सांगली, कोल्हापूर, पन्हाळा, सोलापूर, पंढरपूर, सांगोला या ठिकाणी वसतिगृहे आहेत तर त्यातील मुलांसाठी ७६७ तर मुलींसाठी ३३१ जागा आहेत. नाशिक विभागात नाशिक, अहमदनगर, कोपरगाव, श्रीगोंदा, धुळे आणि जळगाव याठिकाणी मुलग्यांची २१७ तर मुलींची १४८ एकूण क्षमता असलेली वसतिगृहे आहेत. औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, बीड, अंबेजोगाई, उस्मानाबाद, लातूर, जालना आणि नांदेड या ठिकाणी ३२५ मुलांची आणि ८५ मुलींची क्षमता असलेले वसतिगृहे आहेत. अमरावती विभागात अमरावती, अकोला, यवतमाळ आणि बुलढाणा या ठिकाणी मुले आणि मुलींच्या वसतिगृहातील क्षमता अनुक्रमे १४६ आणि ११६ आहे.
नागपूर विभागासाठी फक्त नागपुरात हिस्लॉप महाविद्यालयाच्यासमोर दोन वसतिगृहे असून मुलांसाठीची क्षमता ५० तर मुलींसाठी ४२ आहे. इतर विभागांचा विचार केल्यास नागपूर विभागासाठी सैनिकांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी अल्पव्यवस्था असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. नागपूर जिल्ह्य़ात सुमारे ६,५०० माजी सैनिक आहेत. त्यामुळे शिक्षण घेणाऱ्या त्यांच्या पाल्यांची संख्या काही हजारांच्या घरात जाते. त्यात सहा जिल्ह्य़ांचा विचार केल्यास ३० हजारच्यावर विद्यार्थी संख्या होते. त्यातुलनेत केवळ ९२ विद्यार्थ्यांची सोय होणे माजी सैनिकांच्या कुटुंबीयांच्या दृष्टीने अन्यायकारक आहे.     (क्रमश:)

The soldiers of the nagpur  division  has only   two hostels for rest