निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नवी मुंबई पोलीस यंत्रणा डोळ्यात तेल टाकून खडा पहारा देत आहे. पोलिसांच्या या सतर्कतेमुळे उत्तर प्रदेशमधून नवी मुंबईत येणारा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेने तीन जणांना अटक केली असून त्यांच्याकडून ३ पिस्तूल, ४ गावठी कट्टे आणि १६ जिवंत काडतुसे इतका मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.
महापे येथील मिलेनियम बिझनेस पार्क येथे गुन्हे शाखेच्या युनिट १ चे पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे, पोलीस निरीक्षक गजानन पवार आणि पोलीस उपनिरीक्षक मांगले यांच्या पथकाने १५ एप्रिल रोजी मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचत डोंबिवली येथील रोशन वेदप्रकाश सिंग (२३) आणि अजय रामदवर यादव (२५) यांना अटक केली होती. त्यांच्याकडून २ पिस्तुले आणि ७ जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली होती. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही शस्त्रे टिटवाळा येथील प्रमोद भोय आणि योगेश पाटील यांच्याकडून आणल्याची कबुली दिली. त्याप्रमाणे टिटवाळा येथून प्रमोद भोय (२२) याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून एक पिस्तूल, ४ गावठी कट्टे आणि ९ जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात यश आल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त श्रीकांत पाठक यांनी दिली. यातील योगेश पाटील या आरोपीचा शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. भोय याचा टिटवाळा येथे रेतीचा धंदा आहे. त्याचप्रमाणे आरोपीने त्या ठिकाणी अनधिकृत चाळी बांधल्या असल्याचे तपासात समोर आल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी अटकेत असलेले रोशन सिंग आणि अजय यादव हे त्यांच्याकडे कामाला आहेत. हा शस्त्रसाठा उत्तर प्रदेशमधील जौनपूर येथून आणला असल्याची कबुली आरोपींनी दिल्याचे पाठक यांनी सांगितले. आरोपींवर यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल आहेत. ही शस्त्रे आरोपी कोणाला देण्यासाठी येथे आले होते, तसेच जौनपूरमधून ही शस्त्रे कोणाकडून आणली, याचा अधिक तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
मतदारांनी मोठय़ा संख्येने मतदानासाठी बाहेर पडावे
– अतिरिक्त पोलीस आयुक्त फत्तेसिंग पाटील यांचे आवाहन
२४ एप्रिल रोजी होणाऱ्या ठाणे लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यासाठी केंद्रीय राखीव बलाची एक कंपनी, राज्य राखीव बलाचे ७२५ जवान आणि ४५०० पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. निर्भय वातावरणात मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहन अतिरिक्त पोलीस आयुक्त फत्तेसिंग पाटील यांनी केले आहे. वीसपेक्षा अधिक मतदान केंद्रे असलेला परिसर आणि संवेदनशील मतदान केंद्रावर अधिकचा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर ३३१ शस्त्र परवानाधारकांना शस्त्रे जमा करण्याचे आदेश बजावण्यात आले होते. त्यांच्याशिवाय आणखी वीस जणांनी स्वत:हून त्यांची शस्त्रे जमा केल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे एकूण ३६०० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. राजकीय पक्षाच्या वतीने मतदारांच्या सोयीसाठी व्होटिंग स्लिप देण्यात येतात. या स्लिपवर मतदारांचे नाव असलेल्या ठिकाणी उमेदवाराचे नाव, चिन्ह किंवा पक्षाचे नाव या बाबी नसाव्यात. मतदारांना प्रभावित करणारे कोणतेही कृत्य कोणी करू नये, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
सोनसाखळीचे गुन्हे उघडकीस आणण्यास यश
नेरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोनसाखळी, तोतया पोलीस आणि कोपरखैरण्यात सोनसाखळी चोरणाऱ्याला अटक करण्यात यश आल्याची माहिती परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी दिली आहे. मुंब्रा येथील रशीद कंपाऊंड येथील हेल व्ह्य़ू अपार्टमेंट येथे छापा टाकून शब्बीर अली जाफरी आणि मुस्लीम शब्बीर अली जाफरी यांना अटक करण्यात आली असून त्याच्याकडून नेरुळमधील चार सोनसाखळी चोरीचे आणि एक पोलीस बतावणी करून लुटल्याचे गुन्हे उघडकीस आले आहेत. या गुन्ह्य़ातील पाच सोन्याची मंगळसूत्रे, एक चेन आणि बांगडी असा एक लाख ९० हजार रुपयांचा माल हस्तगत करण्यात आल्याचे मेंगडे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे कोपरखैरणे येथे एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळ काढणाऱ्या चोरटय़ाला नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी पकडल्याचेही त्यांनी सांगितले.