जुन्या भांडणाच्या कारणावरून तीन आरोपींनी एका अल्पवयीन मुलाला जीवानिशी ठार करण्याचा प्रयत्न केला. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या प्रकरणातील आरोपीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
अ‍ॅडविन लेजली मॉन्क्रीफ (१७), रा. रामेश्वरी, काशीनगर, असे जखमीचे नाव आहे. टन्ना उर्फ प्रशांत लोंडे, रा. वसंतनगर, पलाश विजय दिवटे, रा. रमना मारोतीनगर, सोनु वाघमारे, अशी आरोपींची नावे आहेत.
अ‍ॅडविन व ज्ञानेश्वरनगरातील मंगेश टिचकुले हे एकमेकांचे मित्र आहे. काही दिवसांपूर्वी मंगेशच्या भावाचा आरोपींशी वाद झाला होता. गुरुवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास अ‍ॅडविन व मंगेश टिचकुले हे दोघे मानेवाडा रोडवरील मानवी बुटीकजवळ उभे होते. याचवेळी तिघेही आरोपी त्यांच्याजवळ आले व त्यांनी त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली.
या वादात आरोपींनी त्यांना हातबुक्कीने मारहाण केली तसेच तीक्ष्ण शस्त्राने अ‍ॅडविनच्या शरीरावर वार करून त्याला जीवानिशी ठार करण्याचा प्रयत्न केला. अ‍ॅडविनने दिलेल्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास सुरू आहे.
जीवानीशी ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची दुसरी घटना अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुदामनगरी येथे घडली. बबलू अशोक पंधरे (२५), रा. सुदाम नगरी, असे फिर्यादीचे नाव आहे. सुनील भाऊराव ढोके (४०), रा. अभिजीतनगर, असे आरोपीचे नाव आहे.
बबलूने क्षुल्लक कारणावरून सुनीलला शिवीगाळ केली. शिवीगाळ केल्याने सुनील चिडला व रागाच्या भरात त्याने आपल्याजवळील धारदार शस्त्राने बबलूच्या कमरेवर व पोटावर वार करून त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला.
बबलूने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सुनीलवर जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवला आहे.