पौषात विवाह मुहूर्त नसतात. मात्र नुकताच एक विवाह थाटामाटात झाला. वऱ्हाडी-वाजंत्री होते, साजशृंगार होता, गर्दीही होती. पण हे स्वयंवर तसे अनोखे होते. किंबहुना एक प्रकारे पहिलेच होते. कारण वधू आणि वर दोघांचेही आई-वडीलच काय कोणीही नातेवाईक अथवा मित्रमैत्रिणी या विवाहाला उपस्थित नव्हते. आणि जी काही पाहुणेमंडळी आवर्जून आली होती त्यांचा वधू-वराशी तसा कोणताच नातेसंबंध नव्हता.
त्याचे असे झाले :
नाचणारा रोबो, खेळणारा रोबो असे रोबोचे नानाविध प्रकार आपल्याला महाविद्यालयांच्या महोत्सवांत पाहावयास मिळतात. पण चक्क रोबोंचे स्वयंवरच भरविण्यात आले होते. ‘पद्मभूषण वसंतदादा पाटील प्रतिष्ठान’च्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापक नीलेश शहा यांनी ही अनोखी संकल्पना विद्यार्थ्यांसमोर मांडली आणि विद्यार्थ्यांनी ती उचलून धरली. रोबो विकसित करण्याच्या विविध तांत्रिक बाबींची अचूक तपासणी करणारी ही स्पर्धा महाविद्यालयात ‘तंत्र-२०१४’ या महोत्सवात घेण्यात आली. यासाठी मुंबईसह बाहेरील महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. ‘रोबो डीडीएलजे’ असे या स्पध्रेचे नाव ठेवण्यात आले होते.
एका रोबोला मुलीचे रूप देण्यात आले होते. या रोबोरूपी मुलीचे स्वयंवर भरविण्यात आले होते. त्यासाठी विद्यार्थ्यांनी त्यांचे रोबो तयार करून आणायचे. या रोबोंची तीन स्तरावर तपासणी केली गेली. त्या रोबोला नाचायला सांगितले जात असे. त्या रोबो मुलीला ‘प्रपोज’ करण्यासही या ‘पुरुष रोबों’ना सांगितले गेले. एक भूलभुलयाही तयार करण्यात आला होता. त्यातून या रोबोने स्त्रीरूपी ‘रोबो’चा शोध घ्यायचा. या प्रवासात त्यांना एक ‘व्हिलन’ही आडवा येत होता. त्याच्याशी दोन हात करून ‘वधू’पर्यंत पोहोचायचे होते. ही सर्व दिव्ये पार केल्यावर अपेक्षित रोबोची निवड होत होती.
हा महोत्सव तंत्र आणि मज्जा अशा स्वरूपातील असतो. यात मुलांचे तांत्रिक ज्ञान आपोआप आजमावले जाते. आणि धमालही होते, असे प्राध्यापक शहा सांगतात. भारतात प्रथमच आशा स्वरूपाची स्पर्धा झाली असून त्याला बाहेरील विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला.
याव्यतिरिक्त ‘अ‍ॅक्शन पॅक्ड रोबो वॉर’, ‘एथिकल हॅकिंग’ शिकविणारा ‘गोल्डन हॅट ट्रॅकर’, लेझर किरणांचे अडथळे पार करत खजिन्याकडे जाण्याचे आव्हान देणारा ‘लेझर मेझ’, रुबिक क्यूब ट्रिक्स असणारा ‘रुबिक्स-थ्री’, टाकाऊ पदार्थ जोडून टिकाऊ सेतू बनविण्यासाठी ‘स्टीक ओ’मेनिया’, कॉर्पोरेटमधील तांत्रिक समस्या सोडविण्याचे आव्हान देणारा ‘कॉग्निशन’ असे एकापेक्षा एक भन्नाट कार्यक्रम ‘तंत्र २०१४’ मध्ये समाविष्ट होते.