कुंभ पर्वात नाशिक-त्र्यंबकचा नवा चेहरा येणारे भाविक तसेच पर्यटकांसमोर जावा यासाठी विविध विभागांच्यावतीने प्रयत्न सुरू आहेत. वन विभागाने देश-परदेशातून येणारे पर्यटक तसेच भाविकांना हरित नाशिकची ओळख आणि जैव संपत्तीचा परिचय व्हावा यासाठी पांडवलेणीच्या पायथ्याशी अनोख्या निसर्ग संवर्धन केंद्राची निर्मिती केली आहे. या विभागाची काही कामे पूर्णत्वाच्या मार्गावर असली तरी काही कामे मात्र निधीअभावी रखडली आहेत. राज्य शिखर समितीने पहिल्या टप्प्यातील निधी नंतर कुठलाच निधी न दिल्यामुळे त्यांची अवस्था दोलायमान झाल्याचे सांगितले जाते.
वन विभागाने कुंभपर्वात त्र्यंबकेश्वर केंद्रस्थानी ठेवत तेथील काही कामांसाठी चार कोटींची मागणी केली होती. शिखर समितीने यातील काही रक्कम मंजूर केल्याने ब्रह्मगिरीच्या पायऱ्या दुरूस्तीचे काम प्राधान्याने हाती घेण्यात आले. हे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. तसेच कुंभमेळ्यात नाशिकच्या वन संपत्तीचा परिचय बाहेरून येणाऱ्या पर्यटकाला व्हावा यासाठी मागील कुंभमेळ्यात तयार करण्यात आलेले पांडवलेणी येथील वन उद्यानाच्या नूतनीकरणाचे प्रयोजन आहे. केंद्र व राज्यातील वन्यजीव संपत्तीतील जंगली प्राणी, पाणथळातील जैवसंपदा यासह वसुंधरेवरील जैविक विविधता यांची माहिती या केंद्राद्वारे देण्यात आली आहे. वेगवेगळ्या पक्ष्यांची अंडी, काही जनावरांची कातडी, जनावरांच्या पाऊलांचे ठसे, शिंगे आदींची माहिती देण्यात आली आहे. मुलांना पाणथळ सौंदर्याचा प्रत्यय यावा यासाठी काही आकर्षक देखावे तयार करण्यात आले आहे. तसेच राज्यस्तरीय सन्मान चिन्हामध्ये ‘जाऊल’ हे राज्य फूल, हरियल राज्य पक्षी, राज्य प्राणी शेकरू, राज्य वृक्ष आम्र याची सचित्र माहिती देण्यात आली. तसेच औषधी वनस्पतीसह दुर्मिळ वनस्पतींचे आयुर्वेदीक उद्यान, नक्षत्र उद्यान, चंपक वन, वंश वन, अशोक वन आदी विकसीत करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांना जैव विविधतेचा अभ्यास व्हावा यादृष्टीने वन विभागाने काही प्रस्ताव मांडले आहेत. यामध्ये जैव विविधतेची सचित्र माहिती व्हावी यासाठी बंदिस्त स्वरूपातील थिएटर तयार करण्याचा प्रस्तावाला अद्याप सरकारकडून उत्तर आलेले नाही. या परिसरात ब्रिटीशकालीन तळे आहे. उन्हाळ्यात बाष्पीकरणासह अन्य काही कारणांमुळे मोठय़ा प्रमाणावर गळती होऊन तलाव मार्च अखेरीस कोरडा पडतो. वन विभागाने हे तळ्यातील गाळ उपसत गळती थांबविणे, या ठिकाणी पर्यटकांना आकर्षित करता येईल यासाठी बोटींग क्लब किंवा पाणथळाचा विकास करत विविध पक्ष्यांना विसावा करता यावा यासाठी ‘अभयारण्य’च्या धर्तीवर या पाणथळाचा विकास अपेक्षित आहे. वन विभागाच्या पदरात आत्तापर्यंत २.१६ कोटी निधी प्राप्त झाला आहे. पुढील टप्प्यात चार कोटीहून अधिकचा निधी प्राप्त नसल्याने अनेक प्रकल्पांचे भवितव्य अधांतरी बनले आहे.