*  रोज अडीच हजार टन कचऱ्यावर प्रक्रिया होणार
*  २५ ते ३० मेगाव्ॉट वीजनिर्मितीची शक्यता
*   एमएमआरडीएचे अखेर शिक्कामोर्तब
मुंबई महानगर प्रदेशातील सहा महानगरपालिका-नगरपालिकांच्या घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी तळोजा येथे रोज २५०० टन कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पाचे काम ‘मे. राम्की एन्व्हायरो इंजिनीअर्स लि.’ या कंपनीस देण्यावर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने शिक्कामोर्तब केले आहे. लवकरच त्याबाबतचा करार केला जाणार असून या प्रकल्पातून कचऱ्यापासून २५ ते ३० मेगावॉट वीजनिर्मिती होईल, असा अंदाज आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर महानगरपालिका आणि कुळगाव-बदलापूर व अंबरनाथ या नगरपालिका आणि सिडको या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात सहभागी होत आहेत. आरंभी रोज १८०० टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येईल व ती २५०० टनपर्यंत वाढेल. या प्रकल्पासाठी राबवण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत ‘मे. राम्की इंजिनीअर्स’ या हैदराबादच्या कंपनीने चिनी कंपनीशी तांत्रिक सहकार्य करत निविदा दाखल केली होती. निविदा प्रक्रियेत त्यांनी बाजी मारली. पण काही शंकांमुळे दक्षता आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार या प्रस्तावाची छाननी करण्याचे ठरले होते. त्यानुसार प्रक्रिया पार पडून राज्य सरकारने हा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प ‘राम्की’ला देण्यास हिरवा कंदील दाखवला. कचऱ्यापासून वीजनिर्मिती करणारा हा प्रकल्प ‘मे. राम्की’ला देण्यात येत आहे. येत्या आठवडाभरात याबाबतचा करार होईल. हा प्रकल्प सरकारी-खासगी भागीदारी तत्त्वावर राबवण्यात येणार असून कराराचा कालावधी २५ वर्षांचा          असेल.
कचऱ्यापासून वीजनिर्मिती करणारा प्रकल्प उभारणे, तो चालवणे ही जबाबदारी कंत्राटदारावर असेल. या प्रकल्पातून २५ ते ३० मेगावॉट वीजनिर्मिती होईल असा अंदाज असल्याचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त यूपीएस मदान यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.  या प्रकल्पासाठी अंदाजे ३०० कोटी रुपयांचा खर्च आहे. येत्या दोन ते अडीच वर्षांत हा प्रकल्प कार्यान्वित होईल. या प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या विजेचा दर राज्य वीज नियामक आयोग निश्चित करेल, असे मदान यांनी सांगितले.