पनवेलची नवीन ओळख सांगणारे नाटय़गृह राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते उदघाटनाच्या प्रतीक्षेत आहे. पनवेल शहरात अनेक वर्षांनंतर हक्काच्या जागेत तिसरी घंटा वाजणार आहे. नाटय़गृहाची इमारत नुकतीच बांधून झाली. त्यामधील इंटिरिअरचे कामही पूर्ण झाले. मात्र उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करावे, असा अट्टहास आमदार प्रशांत ठाकूर यांनी धरल्याने जोपर्यंत मुख्यमंत्री चव्हाण पनवेलमध्ये नाटय़गृहाचे उद्घाटन करत नाहीत, तोपर्यंत पनवेलमध्ये तिसरी घंटा वाजणार नाही, असे चित्र निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री चव्हाण यांची वेळ मिळावी यासाठी आमदार ठाकूर यांचे मुंबई दौरे वाढले आहेत.
पनवेलचा तोंडवळा वाचन, कलासंस्कृती जपणारा असा राहिला आहे. शहरातील  सुजाण नागरिकांची सांस्कृतिक भूक भागविण्यासाठी नाटय़गृह होणे गरजेचे होते. काँग्रेसच्या हाती नगरपालिका आणि विधानसभेची सत्ता आल्यानंतर रखडलेल्या नाटय़गृहाचे राजकारण न करता आमदार ठाकूर यांनी आपल्या कामाच्या यादीत नाटय़गृहाचे काम पहिल्या श्रेणीवर घेतले आणि त्यासाठी शासनदरबारी धावपळ केली. १७ कोटी रुपये खर्च करून पनवेल पालिकेने ७०० आसन क्षमता असलेले नाटय़गृह उभारले. आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या नावाने नाटय़गृहाची इमारतीचे नामकरण होणार आहे. संपूर्ण वातानुकूलीत असलेल्या या इमारतीमध्ये मुंबई, पुणे येथील नाटक निर्मात्यांनी यावे यासाठी पालिकेने इतर नाटय़गृहांपेक्षा प्रयोगासाठी कमी दर ठेवले. शनिवार आणि रविवारी १० हजार रुपये तसेच इतर दिवसांसाठी ६ हजार रुपये भाडे पालिका आकारणार आहे.
नाटय़ कलावंतांना मुंबईतील प्रयोगानंतर पनवेलमध्ये प्रयोग सादर करून पुण्यातील प्रयोगासाठी अवघ्या दोन तासांचा प्रवास आहे. त्यामुळे पनवेल हे भविष्यात नाटय़निर्माते आणि कलाकारांचे डेस्टिनेशन ठरेल, अशी अपेक्षा येथील नाटय़रसिकांना आहे.
या नाटय़गृहाचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते व्हावा यासाठी आमदार ठाकूर प्रयत्नशील आहेत. २३ तारखेपर्यंत मुख्यमंत्र्यांना वेळ नसल्याचे समजते. त्यानंतर आधिवेशनाची वेळ जाहीर झाल्यास पनवेलकरांना नाटय़गृहाच्या तिसऱ्या घंटेसाठी अजून प्रतीक्षा करावी लागणार, हे निश्चित.