पोलीस ठाण्यालगत असलेल्या हनुमान मंदिराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरटय़ांनी सुमारे ५ किलो चांदीचे दागिने लांबविले. धर्माबाद शहरात सोमवारी पहाटे घडलेल्या या प्रकाराने खळबळ उडाली.
धर्माबाद पोलीस ठाण्यालगत असलेल्या जाज्वल्य हनुमान मंदिरात गोिवदराव कृष्णाचार्य संगमकर व दिनकरराव कुलकर्णी हे दोन पुजारी कार्यरत आहेत. संगमकर खासगी कामासाठी बाहेरगावी गेले होते. रविवारी सायंकाळी कुलकर्णी यांनी पूजा करून रात्री मंदिराला कुलूप लावले. सकाळी त्यांचा मुलगा बाहेरगावी जाणार असल्याने ते पहाटे तीनच्या सुमारास मंदिरात आले. तेव्हा मंदिरातील मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तोडल्याचे लक्षात आले.
मूर्तीला मढवलेली प्रभावळ, छत्र्या, ग्लास, परात व पुजेचे साहित्य गायब झाल्याचे लक्षात आले. मंदिराचे विश्वस्त दिनकरराव संगमकर यांनी तात्काळ मंदिराचे विश्वस्त डॉ. काकानी यांना कल्पना दिली. चोरटय़ांनी मध्यरात्रीच्या सुमारास मंदिराचे कुलूप तोडून ३ लाख रुपयांचा ऐवज लांबविला. शहरात हे वृत्त पसरताच भाविक मोठय़ा संख्येने मंदिराकडे आले. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीधर पवार, शहर उपविभागाचे उपअधीक्षक विजय गबाडे, धर्माबादचे प्रभारी उपअधीक्षक गोवर्धन कोळेकर पथकांसह घटनास्थळी धावले. श्वानपथक मागविले होते. श्वानाने शंकरगंज परिसरापर्यंत माग काढला. त्यामुळे चोरटे शहरातलेच असावेत, असा पोलिसांना प्राथमिक अंदाज आहे. आरोपींच्या अटकेसाठी तपास पथक कार्यरत करण्यात आले. दरम्यान, ४८ तासांत आरोपीला अटक न केल्यास धर्माबाद शहर बेमुदत बंद करण्याचा इशारा नागरिकांनी दिला.