रात्रीच्या पडणाऱ्या थंडीमुळे लागणाऱ्या गाढ झोपेचा गरफायदा घेत सध्या उरण तालुक्यात चोरटय़ांनी धुमाकूळ घातला आहे. जसखार येथील आठ तर पाणजे येथील दहा घरांमध्ये एकाच वेळी चोऱ्या केल्याची घटना घडली आहे, तर नागांव-म्हातवली परिसरात चोरटय़ांनी नागरिकांची झोपच उडविली आहे. त्यामुळे उरण तालुक्यात पोलिसांनी गस्त वाढवली असल्याची माहिती न्हावा-शेवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन.डी.कोकरे यांनी दिलीे.
रात्री अनेक कडय़ा तोडून तसेच खिडक्यांतून शिरून घरफोडी करण्यात येत आहे. एकाच वेळी आठ ते दहा घरांमध्ये चोरी केली जात असल्याने ही टोळी असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे.
उरणमध्ये झालेल्या विकासामुळे अनेकांच्या घरात असलेल्या ऐवजांवर चोरांचा डोळा आहे. दोन वर्षांपूर्वी धुतूम, चिल्रे व जासई परिसरात तर चोरटय़ांनी धुमाकूळच घातला होता. तसेच नागाव येथील एका घरावर दरोडा टाकून घरातील मुलगा, वडील व आईला जिवे मारण्याचाही प्रयत्न झाला होता.
नागांव व म्हातवलीमधील या घटनेमुळे नागरिकांत घबराटीचे वातावरण पसरले होते. त्यामुळे ग्रामस्थांनीच रात्रीच्या वेळी गावाचे रक्षण करण्यासाठी ग्रामसुरक्षा दल तयार करून तरुणांना गावाच्या संरक्षणासाठी सज्ज केले आहे.
मात्र या ग्रामसुरक्षा दलात तरुण असल्याने पोलिसांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर ग्रामस्थांनी, पोलिसांनीच गस्त वाढवावी अशी मागणी केली होती. गावाच्या परिसरात रात्रीच्या वेळी अनेकांना चोर दिसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.