तीन लाख लोकसंख्येच्या इचलकरंजी शहराला शुद्ध पाणीपुरवठा करण्याच्या उद्भवावरून राजकारण तापत चालले आहे. इचलकरंजी नगरपालिकेने याप्रश्नी मंगळवारी विशेष सभा बोलाविली आहे. या पाश्र्वभूमीवर आमदार सुरेश हाळवणकर व विरोधी विकास शहर आघाडीचे नगरसेवक यांनी काळम्मावाडी धरणातून थेट पाणीपुरवठा करण्याचा निर्णय शहरासाठी फायद्याचा असल्याची भूमिका रविवारी घेतली. तर सत्तारूढ गट वारणा नदी उद्भव धरून पाणीपुरवठा योजना राबविण्याच्या निर्णयापर्यंत आली आहे.
इचलकरंजी शहराला सध्या पंचगंगा व कृष्णा नदीतून पाणीपुरवठा होतो. या दोन्ही नद्यांचे पाणी दूषित असल्याने नवी पाणी योजना राबविण्याच्या हालचाली सुरू आहेत. सत्तारूढ गट वारणा नदीतून पाणी आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. सध्या पाणीपुरवठा समितीचे सभापती अब्राहम आवळे आहेत. तर त्यांचे सासरे हे पाणीपुरवठामंत्री लक्ष्मणराव ढोबळे आहेत. त्यामुळे वारणा नदीची पाणीपुरवठा योजना गतीने मार्गी लागेल, असा विश्वास सत्तारूढ गटाला वाटत आहे.    
दरम्यान काळम्मावाडीतून पाणीपुरवठय़ाचा निर्णय शहरासाठी तारक आहे. या धरणात दोन टीएमसीपाणी इचलकरंजीसाठी राखीव असताना वारणेतून पाणीपुरवठय़ाचा निर्णय घेतल्यास हातचे सोडून पळत्याच्या पाठीमागे लागण्याचा प्रकार होणार आहे. त्यामुळे विरोधाला विरोध म्हणून वारणेचा पर्याय न निवडता व्यापक लोकहिताचा निर्णय घ्यावा, अशा आशयाचे पत्रक आमदार हाळवणकर यांनी प्रसिद्ध केले आहे. वारणा नदीही भविष्यात प्रदूषित होणार असल्याने या नदीतून पाणी उपसा करणे अयोग्य ठरेल. काळम्मावाडी धरणातून पाणीपुरवठा करणे हा एकमेव शाश्वत पर्याय उरला असून त्याचा स्वीकार करावा, असेही पत्रकात म्हटले आहे.