खासगी दूरचित्रवाहिन्यांचे आक्रमण आणि संगणक व भ्रमणध्वनीच्या वाढत्या वापराच्या जमान्यातही मराठी वाचन संस्कृती लोप पावलेली नाही. नव्या पिढीकडून वाचन संस्कृतीचे जतन आणि संवर्धन यापुढेही होत राहील, असा विश्वास महाराष्ट्रात ठिकठिकाणी पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात येणाऱ्या प्रदर्शनांचे आयोजक तसेच काही पुस्तक विक्रेत्यांकडून व्यक्त करण्यात आला.
मंगळवारी साजऱ्या झालेल्या जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने बदलती वाचन संस्कृती, वेगवेगळ्या विषयांवरील पुस्तकांना असलेली मागणी आणि वाचन संस्कृतीचे भवितव्य याविषयी ‘लोकसत्ता’शी बोलताना पुस्तक प्रदर्शनांचे आयोजक आणि विक्रेत्यांनी उपरोक्त मत व्यक्त केले.
गेली १८ वर्षे महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी पुस्तक प्रदर्शनांचे आयोजन करणाऱ्या ‘अक्षरधारा’ संस्थेचे लक्ष्मण राठिवडेकर यांनी सांगितले की, सध्या औरंगाबाद आणि दापोली येथे आमचे अनुक्रमे ४७५ आणि ४७६ वे पुस्तक प्रदर्शन सुरू आहे. कोणतेही माध्यम आले तरी मुद्रित माध्यम कधीही लोप पावणार नाही. आज ई-बुक, ऑडिओ बुक बाजारात आली असली तरी मुद्रित पुस्तकांना आजही मागणी असल्याचा आमचा अनुभव आहे. दर्जेदार आणि सकस साहित्य असेल तर मराठी वाचक पुस्तकाच्या किंमतीकडे न पाहता ते पुस्तक खरेदी करतोच करतो. लेखक, कवी, प्रकाशक यांची संख्या वाढताना दिसत असल्याचे सांगून राठिवडेकर म्हणाले की, चंद्रपूर येथेही आमच्या पुस्तक प्रदर्शनाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे प्रकाशक, वितरक आणि विक्रेते यांनी वाचकांपर्यंत पोहोचले पाहिजे. पुस्तक विक्रीसाठी वेगवेगळे अभिनव प्रयोग केले पाहिजेत. धार्मिक व आध्यात्मिक पुस्तकांना मागणी नेहमीच आहे. त्या जोडीला पर्यटन, प्रवासवर्णन, चरित्र, आत्मचरित्र, व्यक्तिमत्व विकास, अर्थ, व्यापार, म्युचअल फंड या विषयांवरील पुस्तकांना जास्त मागणी असल्याचे निरिक्षणही राठिवडेकर यांनी नोंदविले.
‘मायबोली’ पुस्तक प्रदर्शनाचे आयोजक उमेश पाटील म्हणाले की, सध्या ठाण्यात आमच्या संस्थेचे ६५ वे प्रदर्शन सुरू आहे. वाचन संस्कृती कमी झालेली नाही आणि लोप तर अजिबात झालेली नाही. लहान आणि कुमार वयोगटातील मुलेही त्यांच्या पालकांबरोबर प्रदर्शनांना येतात, पुस्तके पाहतात, चाळतात आणि त्यांना आवडतील ती पुस्तके विकत घेतात. सध्याची ही पिढी भविष्यातील चोखंदळ वाचक आणि साहित्यप्रेमी ठरणार आहेत. चरित्र, आत्मचरित्र, अनुवादित पुस्तकांना सध्या जास्त प्रतिसाद मिळत आहे. ज्योतिष, तंत्र-मंत्र या विषयांवरील पुस्तकांनाही आजच्या काळात खूप मागणी आहे.  अमृतमहोत्सवी वाटचाल पूर्ण केलेल्या आयडियल बुक डेपोच्या मंदार नेरुरकर यांनीही वाचन संस्कृती संपलेली नाही, असे मत व्यक्त केले. काही दिवसांपूर्वी अजब पुस्तकालय/प्रकाशन यांच्या सहकार्याने आम्ही पुस्तक प्रदर्शन आयोजित केले होते. कमी किंमतीत वेगवेगळ्या विषयांवरील चांगली पुस्तके उपलब्ध करून दिल्याने वाचकांनी या प्रदर्शनास प्रचंड प्रतिसाद दिला. यात तरुण पिढीचा सहभाग खूप जास्त होता, असेही नेरुरकर म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: There is demand for old books
First published on: 24-04-2013 at 02:05 IST