पाच महिन्यांत १ कोटींचे अमली पदार्थ जप्त
अमली पदार्थाची तस्करी रोखण्याचा दावा पोलीस करीत असले तरी मुंबईत आजही मोठय़ा प्रमाणात अमली पदार्थाची विक्री व सेवन सुरूच आहे. मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी शाखेने चालू वर्षांत केलेल्या कारवाईत तब्बल १ कोटी रुपयांहून अधिक रकमेचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. त्यामुळे शहरात अमली पदार्थाचा व्यवहार किती मोठय़ा प्रमाणावर आणि राजरोसपणे होत आहे ते उघड झाले आहे.
गेल्या काही वर्षांपासून मुंबई आणि परिसरात अमली पदार्थाची तस्करी आणि विक्रीचे प्रमाण वाढले होते. पोलिसांनी त्याविरोधात विशेष मोहीम सुरू केली होती. त्यात फारसे यश आले नसल्याचे चालू आकडेवारीतून दिसून येत आहे. जानेवारी ते मेदरम्यान पोलिसांनी अमली पदार्थविरोधात २१७ गुन्हे दाखल केले आहेत. त्यापैकी १७०० लोकांवर गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून १ कोटी ४ लाख ११ हजार रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे.
अटक केलेल्या आरोपींमध्ये अमली पदार्थाची विक्री करणाऱ्यांची संख्या ४६ असून त्यातील १७ परदेशी नागरिक आहेत. नायजेरियन नागरिक अमली पदार्थाच्या विक्री आणि खरेदी प्रकरणात सर्वाधिक आहेत. त्यांचा मुकाबला करण्यासाठी पोलिसांना तायक्वांडोचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले होते. त्याचा मोठा फायदा झाल्याचे अमलीपदार्थ विरोधी पथकाचे साहाय्यक पोलीस आयुक्त दिगंबर काळे यांनी सांगितले.
पोलीस जी कारवाई करतात त्यापेक्षा किती तरी पटीने अमली पदार्थाचा व्यवसाय सुरू असतो. त्यामुळेच शहराला अमली पदार्थाचा मोठा धोका असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबईच्या विविध भागांत अमली पदार्थाची विक्री आणि सेवन सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. या व्यवसायाच आंतरराष्ट्रीय टोळी सक्रिय आहे.