पुण्यामध्ये शिक्षणासाठी येणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांबाबत आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्र, विद्यापीठाचे विविध विभाग आणि परदेशी नागरिक नोंदणी केंद्र यांच्यामधील समन्वयाअभावी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यानंतर त्यांच्यावर विद्यापीठाचे नियंत्रण राहात नाही. त्यामुळे एखाद्या प्रकरणामध्ये परदेशी विद्यार्थी दोषी आढळल्यास या विद्यार्थ्यांचा ठावठिकाणा शोधण्यासाठी पुरेशी माहिती विद्यापीठाकडे नाही.
जागतिक क्रमवारीमध्ये येण्यासाठी धडपडणाऱ्या पुणे विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय विद्यार्थी विद्यापीठामध्ये शिक्षण घेण्यासाठी यावेत, यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न करत आहे. मात्र, विद्यापीठामध्ये किंवा विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयामध्ये शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विद्यापीठ असमर्थ ठरत आहे. पुणे विद्यापीठामध्ये परदेशी विद्यार्थ्यांने अर्ज केल्यानंतर तो पात्र आहे का आणि त्याची सर्व कागदपत्रे पूर्ण आहेत ना, हे पाहून विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्रामार्फत प्रवेश देण्यात येतो. विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी असलेल्या वसतिगृहाची क्षमता फक्त १८० आहे. त्यामुळे या विद्यापीठाच्या विभागांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाच प्राधान्याने वसतिगृहामध्ये प्रवेश दिला जातो. उरलेले सर्व विद्यार्थी महाविद्यालयामध्ये किंवा विभागामध्ये प्रवेश घेतल्यानंतर कुठे राहतात, याबाबत आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्र कोणतीही पाहणी करत नाही. विद्यापीठामध्ये प्रवेश घेतल्यानंतर या विद्यार्थ्यांची परदेशी नागरिक नोंदणी केंद्रामध्ये नोंद केली जाते. त्यावेळी या विद्यार्थ्यांचे स्थानिक पत्ते, व्हिसाची मुदत या सगळ्या बाबींची नोंद केली जाते. मात्र, हे विद्यार्थी दिलेल्या पत्त्यावर राहतात का, अपेक्षित कालावधीमध्ये त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण झाला का या गोष्टींची वेळोवेळी तपासणी केली जात नाही. विद्यापीठाच्या एखाद्या विभागामध्ये परदेशी विद्यार्थ्यांची पूर्ण आणि अद्ययावत माहिती उपलब्ध नाही.  विद्यापीठाच्या पुनर्मूल्यांकन घोटाळ्यामध्येही ज्या विद्यार्थ्यांनी पैसे देऊन गुण वाढवून घेतले, त्यामध्ये परदेशी विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. या विद्यार्थ्यांचा पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. मात्र यातील काही विद्यार्थी नोंद केलेल्या ठिकाणी राहात नाहीत, तर काही विद्यार्थ्यांनी नोंदलेले पत्ते अस्तित्वातच नाहीत. दरवर्षी नवे विद्यार्थी प्रवेश घेतात. मात्र त्याचवेळी जुने विद्यार्थी उत्तीर्ण होऊन विद्यापीठातून बाहेर गेले का, याची नोंद आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्रामार्फत केली जात नाही. अनेक वेळा केवळ व्हिसा वाढवून घेण्यासाठी सतत छोटय़ा छोटय़ा अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊन वर्षांनुवर्षे विद्यार्थी म्हणून भारतात राहण्याच्या घटनाही यापूर्वी उघडकीस आल्या आहेत.
या वर्षी अडीच हजार विद्यार्थी
या वर्षी पुणे विद्यापीठामध्ये अडीच हजार परदेशी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत संख्येमध्ये वाढ झाली असल्याची माहिती पुणे विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्राचे संचालक डॉ. विजय खरे यांनी दिली.