09 March 2021

News Flash

सपनाचा अद्याप ठावठिकाणा नाही

विदर्भात गाजत असलेल्या घाटंजी तालुक्यातील सपना पळसकर या ७ वर्षांच्या बेपत्ता मुलीच्या प्रकरणाचा कोणताही तपास लागला नसल्याने तिच्या आईवडिलांनी घाटंजीचे ठाणेदार ओमप्रकाश अंबाडकर यांच्या बदलीची

| April 25, 2013 03:29 am

विदर्भात गाजत असलेल्या घाटंजी तालुक्यातील सपना पळसकर या ७ वर्षांच्या बेपत्ता मुलीच्या प्रकरणाचा कोणताही तपास लागला नसल्याने तिच्या आईवडिलांनी घाटंजीचे ठाणेदार ओमप्रकाश अंबाडकर यांच्या बदलीची मागणी केली आहे.
सपना पळसकरच्या बेपत्ता झालेल्या घटनेची सविस्तर माहिती देण्यासाठी शहरात आयोजित वार्ताहर परिषदेत सपनाची आई शारदा पळसकर आणि वडील गोपाळ पळसकर, मनसेच्या महिला जिल्हाध्यक्ष लता चंदेल, तालुका उपाध्यक्ष ज्योती वाघाडे, शहर उपाध्यक्ष ज्योती भुते, विजय चव्हाण, मुलीची आत्या व ग्राम पंचायत सदस्य यशोदा मेश्राम, मत्रीण पूजा मेश्राम आदी उपस्थित होते.
मनसे महिला जिल्हाध्यक्ष लता चंदेल यांनी सांगितले की, ठाणेदार अंबाडकर यांची आठ दिवसात बदली झाली नाही, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल. गुप्तधनासाठी सपनाचे अपहरण करण्यात आल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. या प्रकरणी अशोक दर्शनवार, लक्ष्मण एंबडवार, राजू ताकसांडे आणि अरुण ताकसांडे यांना यापूर्वी अटक करण्यात आली होती व त्यांची जामिनीवर सुटका करण्यात आली आहे.
या सर्वानी जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांची भेट घेऊन सपनाचे अपहरण झाल्याच्या दिवसापासून आजपर्यंतच्या घडामोडींचा पाढा पोलीस अधीक्षकांसमोर वाचला. हे प्रकरण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात आले असून या विभागाचे एक पथक राजस्थानात जाऊन आले, पण कोणतेही धागेदोरे तेथे गवसले नाहीत. दरम्यान, सपना सुखरूप असल्याच्या वार्ता आल्या होत्या, असे सांगून लता चंदेल यांनी पोलीस अधीक्षकांना सवाल केला की, जर या वार्ता खऱ्या असतील तर सपना कुठे आहे, तिला परत आणा, अशी आमची मागणी आहे.
तक्रारकर्त्यांनाच पोलीस त्रास देत असल्याचा आरोप यावेळी मनसेच्या महिला नेत्यांनी केला आहे. २४ ऑक्टोबर २०१२ ला सपनाचे अपहरण झाले. या घटनेला आता ६ महिने झाले आहेत, मात्र अजूनही सपनाचा पत्ता लागला नसल्याने सपनाचे आईवडील आणि सारे कुटुंबीय कमालीचे दुखी आहेत. आम्हाला आमची सपना मिळवून द्या हो, असा त्यांचा आक्रोश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 25, 2013 3:29 am

Web Title: there is no any news of sapna
टॅग : News,Yavatmal
Next Stories
1 एलबीटी बंदला प्रतिसाद ‘संमिश्र’
2 रुग्णसेवेची साखळी निखळली
3 काँग्रेस नगरसेवकाला तडीपारीची नोटीस
Just Now!
X