करिना कपूर-खान झाल्यानंतर तिचा ‘तलाश’ हा पहिला चित्रपट प्रदर्शित होतो आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत विवाहित अभिनेत्रीकडे पाहण्याचा निर्माता-दिग्दर्शकांचा दृष्टिकोन वेगळा असतो. विवाहानंतर त्यांची कारकीर्द संपल्यात जमा असते, असा एक प्रचलित समज आहे. त्याला आजच्या काळात काही अपवादही आहेत. पण, विवाहानंतर बऱ्याचशा अभिनेत्री घरसंसारात रमलेल्या दिसतात. करिना कपूरला मात्र अशी कोणतीही भीती वाटत नाही. माझ्यासाठी विवाहानंतर काहीही बदललेले नाही, असे ती म्हणते. ‘विवाहाच्या आधीचा काळ आणि आत्ताचा काळ यात मला अजिबात फरक वाटत नाही. तुमच्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोण बदललेला असतो, पण तो एक विवाहित जोडपे म्हणून बदललेला असतो. त्यापलीकडे तुमचे क्षेत्र, तुमच्या कारकीर्दीतील जबाबदाऱ्यांत फारसा बदल होत नाही. एक अभिनेत्री म्हणून माझ्यासाठी काहीही बदललेले नाही. विवाहानंतरही मी माझे काम तितक्याच प्रेमाने सुरू ठेवणार आहे’, असे करिना कपूरने म्हटले आहे.
करिना कपूर पहिल्यापासूनच आपल्या अभिनयातील कारकीर्दीबद्दल गंभीरपणे विचार करत आली आहे. ‘थ्री इडियट्स’च्या यशानंतर चित्रपटांची विचारपूर्वक निवड करण्यावर तिचा भर राहिला असून ‘तलाश’ हा आपल्या कारकीर्दीतील महत्त्वाचा चित्रपट आहे, असे तिला वाटते. तलाशमध्ये तिने कॉलगर्लची भूमिका केली आहे. याआधी ‘चमेली’ या चित्रपटातही तिने अशाप्रकारची भूमिका केली होती. मात्र, तलाशमध्ये कॉलगर्लची तिची व्यक्तिरेखा ही एका खूनाच्या रहस्याभोवती गुंफण्यात आली असल्याने तिच्या भूमिकेला एक वेगळा आयाम मिळाला आहे. विवाहानंतर ‘तलाश’ हा पहिलाच चित्रपट असल्याने त्याच्याबद्दल तिलाही प्रचंड उत्सुकता असल्याचे करीना कपूरने सांगितले.