भारतात येणाऱ्या जपानी कंपन्यांची संख्या गेल्या पाच वर्षांत तिपटीने वाढली असून, त्याचबरोबर या भाषेसाठी असलेल्या नोकरीच्या संधीसुद्धा कमालीच्या वाढल्या आहेत. अशी वस्तुस्थिती असली तरी जपानी भाषा शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांचे प्रमाण मात्र रोडावते आहे. गेली दोन वर्षे देशातील जपानी भाषा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट होत असल्याचे दिसून आले आहे.
‘इंडो जॅपनीज असोसिएशन’चे अध्यक्ष रमेश दिवेकर यांनी ही माहिती दिली. जानेवारी २००६ मध्ये भारतातील जपानी कंपन्यांची संख्या २६७ होती. ऑक्टोबर २०११ मध्ये ही संख्या ८१२ झाली आहे. ऑक्टोबर २०११ ते ऑक्टोबर २०१२ या एका वर्षांत एकटय़ा महाराष्ट्रातच ४० जपानी कंपन्या आल्या. भारतातील जपानी दूतावासाच्या माहितीनुसार, मुंबईत जपानी कंपन्यांचे १६२, तर पुण्यात ५६ विभाग कार्यरत आहेत. दिल्लीत १४९ ठिकाणी, तर दिल्लीजवळील मणेसर (गुरगाव) आणि राजस्थानच्या भागात २६५ ठिकाणी जपानी कंपन्यांचे विभाग आहेत.
असे असले तरी जपानी कंपन्यांना अपेक्षित असणारा जपानी भाषेचा दर्जा आत्मसात करण्यात भारतीय विद्यार्थी कमी पडताहेत. याचा परिणाम या विद्यार्थ्यांना उपलब्ध होणाऱ्या नोकरीच्या संधींवर होतो आहे. गेली दोन वर्षे जपानच्या औद्योगिक क्षेत्रासाठी विविध आपत्तींमुळे अडचणीची ठरली होती. जपान भारताकडे आफ्रिकन आणि युरोपियन देशांपर्यंत पोहोचण्यासाठीचे ‘औद्योगिक हब’ म्हणून पाहतो. प्रस्तावित ‘दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर’ झाला तर यातील अकराशे किलोमीटर लांबीच्या रेल्वे ट्रॅकच्या बाजूने ३०० ते ३५० जपानी कंपन्या भारतात येतील अशी आशा आहे. मात्र हा कॉरिडॉर होणे लांबल्यामुळे जपानी शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांत निराशेचे वातावरण आहे. या सगळय़ाचा एकत्रित परिणाम म्हणून जपानी भाषेकडे भारतीय विद्यार्थ्यांचा ओढा घटतो आहे.
दिवेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आयात केलेली यंत्रसामग्री कंपनीच्या येथील विभागात बसवण्याच्या कामात जपानी कंपन्यांना दुभाषांची गरज भासते. मात्र या दुभाषांच्या भाषेचा दर्जा थोडा कमी असला तरी चालतो. प्रत्यक्ष उत्पादनप्रक्रियेत शॉप फ्लोअरवर काम करणाऱ्या दुभाषांचे जपानीचे ज्ञान अधिक चांगले असावे लागते. तर व्यापारविषयक बैठकींसाठी काम करणाऱ्या दुभाषांच्या भाषेचा दर्जा सर्वात उत्तम असणे अपेक्षित
असते.
दिवेकर म्हणाले, ‘‘याशिवायही इतर अनेक कामांत जपानला दुभाषे व अनुवादकांची गरज भासते. जपानी भाषेच्या विद्यार्थ्यांनी कंपन्यांच्या तांत्रिक बाबींचीही माहिती मिळवायला हवी. झटपट नोकरी मिळवणे हा एकच उद्देश न ठेवता सातत्याने, जीव ओतून ही भाषा आत्मसात केली तर नोकरीच्या नवनवीन आणि उत्तम मोबदला मिळवून देणाऱ्या संधी या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होत आहेत.’’ याबाबत जपानचे कौन्सल जनरल कियोशी असाको यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, ‘‘भारतीय विद्यार्थी जपानी भाषा केवळ नोकरी मिळविण्याच्या उद्देशाने शिकतात. भारतात येणाऱ्या जपानी कंपन्यांची संख्या जरी वाढली असली तरी त्यांना लागणाऱ्या दुभाषांची संख्या तुलनेने कमी आहे. हे दुभाषे जपानीबरोबरच इंग्लिशमध्येही उत्तम असणे अपेक्षित असते. हा दर्जा कमावण्यात भारतीय विद्यार्थी कमी पडतात. जपानी भाषेत चांगले गुण मिळविणे सोपे नाही. पण या भाषेचा आनंद घेऊन आणि झोकून देऊन अध्ययन केले तर भारतीय विद्यार्थ्यांसाठी नोकरीच्या संधी भविष्यात नक्कीच वाढणार आहेत.’’
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 25, 2012 3:19 am