सरसंघचालकांचा सवाल
देशाच्या सीमा सुरक्षित नाहीत. बंदोबस्त व्यवस्थित ठेवला जात नाही. आंतरराष्ट्रीय राजकारणात भारत पुढे येऊ नये, असे वातावरण निर्माण केले जात आहे. हैदराबाद व बंगळुरू शहरांत बॉम्बस्फोट झाले. बॉम्बस्फोट झाले की नुसती चर्चा होते. नकारात्मक चर्चेला वावही आहे. मात्र, अशा चर्चाचा उपयोग काय? केवळ सरकार व प्रशासन यांना दोष देऊन चालणार नाही, तर एकतेने व गुणवत्तेने परिस्थितीशी लढण्यास हिंदुत्व हाच एकमेव विचार ठरणारा आहे,   असे   प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.
औरंगाबाद शहराचा वर्षप्रतिपदा उत्सवात ते बोलत होते. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर आयोजित या कार्यक्रमात व्यासपीठावर डॉ. उपेंद्र अष्टपुत्रे, गंगाधर पवार, देवानंद कोडगिरे यांची उपस्थिती होती. आपल्या तासाभराच्या भाषणात डॉ. भागवत पुढे म्हणाले, की वर्ष प्रतिपदेनिमित्त नवीन संकल्प केले जातात. परिस्थिती बदलण्यासाठी व संपूर्ण देश माझा आहे, असे प्रत्येकाला वाटावे असे वातावरण निर्माण करण्यासाठी स्वयंसेवकांनी अधिक वेळ द्यावयास हवा. देशात राहणारे सर्व जण हिंदूच आहेत. त्यांची पूजापद्धती कदाचित निराळी असेल. मात्र, वंशाने भारतीय असणारे हिंदूच आहेत. काही जण हिंदू असल्याचे विसरले आहेत. त्यांना तशी आठवण करून द्यायला हवी. समाज एकसंध व्हावा, या साठी प्रत्येकाने संकल्प करायला हवा.
भाषणाच्या सुरुवातीला महात्मा फुले व डॉ. हेडगेवार यांच्या विचारधारेतील समानता डॉ. भागवत यांनी आवर्जून अधोरेखित केली. रुढींच्या पाशात करकचून बांधलेल्या समाजाला माणुसकीच्या धर्मात उभे करण्यासाठी महात्मा फुले यांनी सतत प्रयत्न केले. आपला विचार रेटत आपल्या विचारांच्या बाजूने अधिक माणसे उभी राहायला हवीत, या साठी महात्मा फुले यांनी प्रयत्न केले. विरोध करणाऱ्यांचेही भलेच होवो, असे त्यांचे चिंतन होते. अशीच विचारांची समानता डॉ. हेडगेवार यांच्याकडेही होती. मृतप्राय हिंदू समाजाला जागे करण्यासाठी अव्यवहार्य व अशक्य वाटणारे संघटन हेडगेवार यांनी उभे केले. हा समान धागा संकल्पाचा होता, असेही डॉ. भागवत यांनी सांगितले.