औरंगाबाद शहरासह ३०५ गावांच्या विकासाचे नियोजन करण्यात येत आहे. त्यात मेट्रो रेल्वेचा समावेश करून नागपूरप्रमाणेच औरंगाबाद शहरासाठी मेट्रोचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राकडे पाठवावा, अशी मागणी मराठवाडा जनता विकास परिषदेने केली आहे.
औरंगाबाद येथे ट्रिपल आयटीची घोषणा तत्कालीन केंद्रीय मंत्री प्रमोद महाजन यांनी केली होती. मात्र, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नागपूर येथे ट्रिपल आयटी होईल, असे घोषित केले. हा मराठवाडय़ावर अन्याय असल्याचे मराठवाडा जनता विकास परिषदेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रदीप देशमुख यांनी एका पत्रकात म्हटले आहे.
मराठवाडय़ात कला विद्यापीठ स्थापन होण्याची गरज होती. तसे ठरलेही होते. अजिंठा-वेरुळचा वारसा असणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्य़ात विद्यापीठ स्थापन होणे अधिक औचित्यपूर्ण ठरले असते. तथापि, हे विद्यापीठ पुणे शहरात स्थापन करण्याचा निर्णय झाला आहे. यातूनही मराठवाडय़ाविषयीचा आकस असल्याचे दिसून येते. तसेच राष्ट्रीय विधी विद्यापीठ स्थापन करण्याबाबत पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाच्या अंमलबजावणीत चालढकल केली जात आहे.
तसेच पॅरामेडिकल इन्स्टिटय़ूटसाठी घाटी रुग्णालय परिसरात जागा उपलब्ध करून देण्यासही हेतूत: टाळाटाळ होत असून, महत्त्वाच्या संस्था अन्य शहरांमध्ये स्थापन व्हाव्यात असे प्रयत्न सुरू झाले आहेत. मराठवाडय़ावरील हा अन्याय नवी पिढी सहन करणार नाही. यातून स्वतंत्र मराठवाडय़ाची मागणी पुढे आल्यास राज्य सरकार जबाबदार राहील, असा इशाराही अ‍ॅड. देशमुख यांनी दिला आहे.