वडिलांच्या सततच्या मारहाणीमुळे नैराश्यग्रस्त झालेल्या मुलाने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाल्याने उच्च न्यायालयाने आपल्या ११ वर्षांच्या मुलाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल ओशिवरा येथील दिवाण सिंग या पित्याला पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा अलीकडेच सुनावली. या निकालानंतर पुन्हा एकदा मुलांसंदर्भातील शिस्त आणि शिक्षा याबाबत चर्चेचे मोहोळ उठले आणि पालक-शिक्षक वर्तुळात याबाबतच्या चर्चा झडू लागल्या. अनेकदा मुलाच्या शिस्त आणि शिक्षेच्या कल्पनेबाबत ‘आम्ही नाही का भोगल्या भलत्या भलत्या शिक्षा नि फोकाचा मार, आमचे काय वाईट झाले?’ असा पालकांचा अ‍ॅप्रोच असतो. मात्र आपण केलेल्या शिक्षेमुळे आपल्या मुलांच्या वर्तणुकीतले नकारात्मक वा हिंसक बदल त्यांना बावचळून टाकतात. तरीही आपल्या मारामुळे मूल आणखीच बिथरतंय, हेच पालक नाकारतात. अशा वेळेस मुलांची वर्तणूक सुधारण्याचा मूळ हेतू बाजूला राहून भलतंच त्रांगडं होऊन बसतं, जे पालकांच्या कह्य़ापलीकडचे असते आणि त्याबाबत नक्की काय उपाय योजायचे, हेच पालकवर्गाला कळेनासं होतं.  यानिमित्ताने शिस्त आणि शिक्षा याबाबतचा पालक-शिक्षकवर्गाचा अ‍ॅप्रोच कसा असावा, हे मुला-पालकांसोबत काम करणाऱ्या व्यक्तींकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता या सर्वानीच शिस्त आणि शिक्षा याचे सुतराम संबंध असण्याचे कारण नाही, हे ठामपणे सांगितले.    

आत्मसन्मान दुखावतो..
मुलांच्या वर्तणुकीच्या समस्येने त्रस्त असलेले पालक जेव्हा मुलांना आमच्याकडे घेऊन येतात, त्या मुलांशी बोलताना जाणवतं की, या सगळ्याच्या मुळाशी कुठेतरी पालकांची मुलांशी असलेली वागणूक कारणीभूत आहे. मुलांचा विश्वास संपादन करून त्यांच्याशी बोलताना स्पष्ट होतं की, आई-बाबांच्या मनाविरुद्ध घडल्यानंतर ते करत असलेल्या शिक्षेमुळे मुलं बेजार झाली आहेत. अनेक प्रकरणांमध्ये उच्चशिक्षित पालकांनीही मुलांना चटके देणं, उपाशी ठेवणं, मारणं, रात्री घरातून बाहेर काढणं, वारंवार धमकी देणं असे गैरप्रकार केल्याचं स्पष्ट होतं. आई-वडिलांच्या अशा वर्तनाचा मुलांच्या व्यक्तिमत्त्वावर खोल परिणाम होतो. अशा वेळेस मुलं स्वत:चं नुकसान करून घेतात, अन्यथा वाईट मार्गाला लागतात. अशा शिक्षांना सामोरे जावं लागलेल्या मुलांचा आत्मविश्वास डळमळीत होतो, त्यांचा आत्मसन्मान दुखावतो. त्यांच्यातील भयगंड, न्यूनगंड वाढतो. अमली पदार्थाचं व्यसन लागण्यामागचं कारण हेही असू शकतं. उलटपक्षी, काही मुलं अधिकच हिंसक होतात. घरात पालकांचा मार सहन करणारी मुलं बाहेर आपला राग इतरांवर काढतात. खेळताना वा शाळेत इतर मुलांना मारणं, शिक्षकांचं वा इतर मोठय़ा व्यक्तींचं न ऐकणं, उलट उत्तरं देणं हा या मुलांचा स्वभाव बनतो. असहाय्यपणे पालकांचा मार खाणारी ही छोटी मुलं मोठी झाली की, आई-वडिलांवर हात उगारायला कमी करत नाहीत. त्यांचं स्वत:चं कुटुंब जेव्हा बनतं, तेव्हा ही मुलं आपल्या जोडीदारावर नाहीतर मुलांवर मनात वर्षांनुर्वष दडपलेला राग काढू लागतात. मुलाला शिस्त लावताना पालकांनी हे लक्षात घ्यायला हवं की, शिस्त वेगळी आणि धाक वेगळा. ‘आम्हाला तू आवडतोस, मात्र तुझी ही वर्तणूक रुचत नाही,’ असं सांगत मुलाच्या वर्तणुकीत बदल होण्यासाठी पालकांनी त्याला विश्वासात घेऊन बोलतं करायला हवं. त्याऐवजी जर मुलाला घरच्यांकडून नकार मिळाला तर त्याला व्यक्तिमत्त्वाचा डोलारा कोसळू शकतो.
    डॉ. अजय ताम्हाणे, मानसोपचारतज्ज्ञ

couple confessed to murdering the girl as they could not take care of it
मुलीचा सांभाळ करता येत नसल्याने केली हत्या, दाम्पत्याची कबूली
Solapur Murder wife, Solapur, Murder second wife,
सोलापूर : तीन घरांच्या दादल्यात आर्थिक कारणांवरून दुसऱ्या पत्नीचा खून, रक्ताने माखलेल्या चाकूसह पती पोलिसांत हजर
demonetisation decision taken by modi government in 2016 was illegal and wrong says justice bv nagarathna
‘निश्चलनीकरणाचे परिणाम उद्दिष्टांच्या विरोधात’, सामान्य माणसाला झालेल्या त्रासाने अस्वस्थ- न्या. नागरत्न
Priyadarshni Rahul
हुंड्याविरोधात असाही लढा! लग्न मोडल्यानंतर तिने घडवली ‘अशी’ अद्दल, कायद्याचा अभ्यास अन् १४ वर्षे लढा!

पालकांचेच नैराश्य कारणीभूत
पालकांच्या अशा कृतीला खरे तर पालकांचेच नैराश्य आणि अस्वस्थता कारणीभूत असते आणि या नैराश्याला आणि अस्वस्थतेचं काय करायचं, हे त्यांना ठाऊक नसतं. आपलं मूल माझं ऐकत नाही, म्हणजे काय, असा या पालकांचा सवाल असतो आणि मग मूळ हेतू बाजूला राहून मुलांचा छळ सुरू होतो. त्याऐवजी मुलं तसं का वागतात, हे पालकांनी जाणून घ्यायला हवं. मात्र हे जाणून घेण्याची आणि त्यात बदल व्हावेत म्हणून प्रयत्न करण्याची प्रक्रिया वेळकाढू असते आणि हे प्रयत्न चिकाटीने करावे लागतात. मुळात पालकांना दैनंदिन आयुष्यात असलेले तणाव आणि वेळेची कमतरता यामुळे असे प्रयत्न करण्याऐवजी मुलांच्या समस्येवर इन्स्टंट उपाय पालक शोधतात. उदा. मार्क मिळवण्यासाठी क्लासला टाकणं. मात्र, मुलांच्या समस्यांच्या सोडवणुकीसाठी पालक आणि मुलं दोघांनीही संयम राखायला हवा. मुलाचं वागणं सुधारण्यासाठी एकेक गोष्टी करून पाहाव्या लागतात. अशी कुठलीही जादुची कांडी नाही, ज्याने मुलाचं वागणं क्षणार्धात पालटू शकते, हे पालकांनी लक्षात घ्यायला हवं. त्यासाठी मुलांना वेळ आणि वाव द्यायला हवा. अनेक चुका या ‘रिव्हर्सेबल’ असतात, त्या मुलाच्या हातून झाल्याने आकाश कोसळत नाही. अशा वेळेस पालक आणि मुलांमधील संवादाची दारं कुठल्याही परिस्थितीत बंद होता कामा नये.     मिथिला दळवी, संचालक, ‘संवाद : अ डायलॉग’

पालकांनी मुलाच्या मानसिकतेबाबत जागरूक राहावे
पालकांचे मुलांना रागे भरण्यामागे अनेकदा ‘मी म्हणतो तसं तू वागायला हवंस,’ असा आडमुठेपणा असतो. मुलांच्या शिस्तीचा मुद्दा हा पॉवरगेम पद्धतीने खेळला जातो. अशा घरातली मुलं समस्याग्रस्त बनतात. पालकांचं निमूटपणे ऐकणारी, भ्यालेली मात्र चिडखोर बनतात. त्यांच्या पुढील आयुष्यात असमाधानी आणि सोबतच्या व्यक्तींवर राग काढत असतात. न ऐकणाऱ्या मुलांच्या वर्तणुकीचे टोक म्हणजे ते गुन्हेगारीकडे वळतात. लहान मुलांवर खेळलेला पालकांचा हा ‘पॉवरगेम’ मोठेपणी बूमरँग होऊन पालकांवरच उलटू शकतो आणि मग या ‘पॉवरगेम’चे सूत्रधार लहानपणी मार सहन केलेली मुलं बनतात. म्हणूनच शिस्त वा वर्तणुकीचे नियम सांगताना त्यामागचा ‘का?’ हा पैलू मुलांना नीट उमजायला हवा. ही विचार करण्याची क्षमता अति शिस्तीतल्या वातावरणात मुलांमध्ये निर्माण होत नाही. त्यामुळे मुलांना विचार करण्यासाठी ‘अवकाश’ मिळायला हवा आणि पालकांनीही मुलांच्या बाबतीतला ‘च’ गाळायला हवा- उदा. असंच व्हायला हवं, एवढे मार्क मिळायलाच हवेत.  म्हणूनच महत्त्वाचं हे ठरतं की,  आपलं मूल मानसिकदृष्टय़ा कुठे आहे, याबाबत प्रत्येक पालकाने जागरूक असणं.
    नीलिमा किराणे, संचालक, अ‍ॅप्रोच लर्निग सेंटर