विदर्भात नवीन रेल्वेगाडय़ा सुरू करण्यासोबतच वर्धा लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या मोठय़ा रेल्वे स्थानकांवर महत्वाच्या गाडय़ांना थांबा देण्याची मागणी गेल्या तीन वर्षांंपासून सातत्याने रेल्वे मंत्रालयाकडे होत असून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत विदर्भाचे ज्येष्ठ नेते खासदार दत्ता मेघे यांनी लोकसभेच्या शून्य प्रहरात व्यक्त केली.
रेल्वेबाबतचा हा मुद्या यापूर्वीही आपण वेळोवेळी लोकसभेत मांडला आहे, याचे स्मरण करून देत ते म्हणाले, या मतदारसंघात हिंगणघाट, चांदूर (रेल्वे) आणि धामणगाव (रेल्वे) ही मोठी स्थानके असून पूर्व-पश्चिम आणि उत्तर-दक्षिण मार्गावरील सर्व गाडय़ा या स्थानकांवरूनच जातात, मात्र प्रमुख गाडय़ांचा येथे थांबा नसल्याने सुविधा असूनही त्याचा प्रवाशांना लाभ मिळत नाही, अशी अवस्था झाली आहे. या गावांवरून वर्धा, अमरावती, नागपूर येथे असंख्य विद्यार्थी, व्यापारी आणि नोकरदार स्त्री-पुरुष दररोज ये-जा करीत असतात, मात्र महत्वाच्या गाडय़ा थांबत नसल्याने त्यांची सतत गैरसोय होते.     हिंगणघाट येथे जयपूर एक्स्प्रेस, मद्रास-जोधपूर एक्स्प्रेस, तसेच सिकंदराबाद-बिकानेर एक्स्प्रेसचा थांबा दिल्यास स्थानिक व्यापारी आणि अन्य नागरिकांना सोयीचे होईल. अमरावती जिल्ह्य़ातील चांदूर आणि धामणगाव येथील प्रवासी हजरत निजामुद्दीन-गोंडवाना एक्स्प्रेस, अमरावती-नागपूर इंटरसिटी एक्स्प्रेस आणि जबलपूर एक्स्प्रेस या गाडय़ांचा थांबा देण्याची मागणी अनेक वर्षांंपासून करीत आहेत, तर सिंदी (रेल्वे) येथील विद्यार्थी, नोकरदार आणि व्यापारी वर्धा, नागपूर येथे दररोज ये-जा करतात. त्यांच्या सुविधेसाठी अमरावती-नागपूर इंटरसिटी एक्स्प्रेस आणि अमरावती व नागपूरला जाणाऱ्या अन्य गाडय़ांचा थांबा असणे आवश्यक आहे. या थांब्यामुळे भारतीय रेल्वेला फोयदाच होणार असून या शहरातील प्रवाशांनाही रेल्वेसेवा प्राप्त होईल. तेव्हा रेल्वे मंत्रालयाने विदर्भातील या महत्वाच्या स्थानकांकडे दुर्लक्ष न करता या रेल्वे स्थानकांवर थांबा देण्याबाबत, तसेच नवीन गाडय़ा उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही करावी, अशी मागणी खासदार मेघे यांनी यावेळी केली.