दीपावलीला अद्याप काही दिवसांचा अवधी शिल्लक असला तरी शहरात चोरटय़ांनी नागरिकांचे दिवाळे काढण्यास सुरूवात केली आहे. नाशिकरोड परिसरात दोन दुकाने फोडून ७३ हजार रूपयांची चोरी, अंबड औद्योगिक वसाहतीसमोर विश्रामगृह आणि जेलरोड भागातील घरातून सुमारे दीड लाखांची घरफोडी आणि एकाच दिवशी दोन इनोव्हा मोटारींची चोरी या घटना त्याचे निदर्शक म्हणता येतील. या प्रकरणी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
बिटको चौकातील वर्षां इलेक्ट्रॉनिक्स आणि मोहिनी सारीज या दुकानांचा कडी कोयंडा तोडून चोरटय़ांनी एलईडी टीव्ही, भ्रमणध्वनी, १५ हजाराची रोकड, महागडय़ा साडय़ा असा ७३ हजार रूपयांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी जगदीश कलंत्री यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. जेलरोड परिसरातील आमलीन सोसायटीतील लिओ फर्नाडिस यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून चोरटय़ांनी ९५ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने गायब केले या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तशीच घटना अंबड औद्योगिक वसाहतीसमोरील वासु ओम गेस्ट हाऊस येथे घडली. येथून ४५ हजार रूपयांचा माल चोरटय़ांनी चोरून नेला. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घरफोडीचे गुन्हे वाढत असताना दुचाकीपाठोपाठ चारचाकी चोरीला जाण्याच्या प्रकारांमध्ये वाढ झाली. वाहन चोरांनी आपला मोर्चा चार चाकी वाहनांकडे वळविला आहे. शहरातील कॉलेजरोड परिसरातील पंचम सोसायटी येथे निफाड येथील शास्त्रीनगर पसिरातील रवींद्र साहेबराव आवारे (४९) काही कामानिमित्त आले होते. उशीर झाल्याने ते नातेवाईकांकडे मुक्कामी राहिले. मात्र रात्री उशीराने त्यांची पाच लाख किंमतीची
इनोव्हा मोटार चोरटय़ांनी गायब
केली.
या प्रकरणी गंगापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॉलेजरोड येथील सुरज संकुल परिसरात राहणारे सोमनाथ शंकरलाल जाजु (६२) यांची इनोव्हा मोटार वाहनतळातून सोमवारी रात्री चोरीला गेली. सातपुर परिसरातून दुचाकी अज्ञात चोरटय़ांनी लंपास केली. त्या प्रकरणी सातपूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.