ग्रामीण भागात उन्हाळ्यात घराबाहेर अंगणात झोपण्याची पद्धत आहे. याच परिस्थितीचा फायदा घेऊन चोर व दरोडेखोरांच्या टोळ्या जिल्ह्य़ात सक्रीय झाल्या आहेत. दररोज कुठे ना कुठे घरफोडी होत असून महिलांच्या अंगावरील दागिनेही हिसकावले जात आहेत. पोलिस दल मात्र अजूनही यावर अंकुश घालण्यात अपयशी ठरला आहे. त्यामुळे आता गावकऱ्यांनीच रात्री गस्त घालून ‘जागते रहो’ मोहीम सुरू केली आहे.
वाढत्या उकाडय़ामुळे ग्रामीण भागात रात्री घरासमोरील अंगणात, तर काही नागरिक उकाडय़ापासून मुक्ती मिळावी म्हणून घराचे दरवाजे उघडे करूनच झोपतात. यामुळे चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. अंगणात सर्व झोपलेले असताना घरात दरोडा घालून चोरटे पसार होत आहेत. जिल्ह्य़ाच्या सर्वच तालुक्यांमध्ये ‘चोर आला रे आला’ची बोंब सुरू आहे. सर्वाधिक चोऱ्यांची चर्चा आमगाव तालुक्यात असून या तालुक्यातील किकरीपार, कट्टीपार, सुपलीपार, भोसा, कालीमाटी, गोरठा, धावडीटोला, बोथली, कातुर्ली या गावांमध्ये रात्रभर लोक गस्त घालत आहेत व या गावांमध्ये काही नागरिकांनी तर चोरांचा पाठलागही केला. परंतु, चोर त्यांच्या हातावर तुरी देऊन पसार झाले. गोंदियाजवळील धामणेवाडा येथे एकाच रात्री चोरांना ८ घरी चोरी केल्याची घटना मागच्याच आठवडय़ात घडली होती. नागरिकांच्या चच्रेनुसार चोरांच्या मोठमोठय़ा टोठय़ा जिल्ह्य़ात दाखल झाल्या आहेत. विना नंबरच्या दुचाकी गाडय़ांनी चोर गावात येतात. गावाबाहेर या गाडय़ा ठेऊन गावात शिरतात व गावकऱ्यांनी पाठलाग करताच गाडय़ांवर बसून पसार होतात. एक चारचाकी गाडीही विना क्रमांकाची फिरत असून ती आधी रेकी करून जात असल्याची जिल्ह्य़ात चर्चा आहे.
काही तालुक्यांमध्ये चोरांची दहशत मोठय़ा प्रमाणात वाढल्याने नागरिक रात्रभर जागत आहेत. विशेष म्हणजे, चोरी करणारे आतापर्यंत नागरिकांच्या आणि पोलिसांच्याही हाती लागले नाहीत. असे असले तरी मागील पंधरवडय़ापासून जिल्ह्य़ात चोरी, दरोडय़ांचे प्रमाण वाढले आहेत. अंगणात झोपलेल्या स्त्रियांच्या अंगावरील दागिने चोर उडवत आहेत. नागरिक उठू नये याकरिता गुंगीच्या औषधांचा वापर केला जात असल्याची चर्चा आहे. चोरांच्या धुमाकुळाने जिल्ह्य़ातील नागरिक मोठय़ा प्रमाणात धास्तावले असून अनेकांनी अंगणात झोपणे टाळले आहे. ग्रामीण भागात साधारण शेतकरी व गरीब कुटुंब वास्तव्यास आहेत. अनेक घरांमध्ये कूलर तर सोडाच परंतु, साधे पंखेही नाहीत. यामुळेच वाढत्या उकाडय़ापासून थंडावा मिळावा, या हेतूने ग्रामीण भागात नागरिक अंगणात हवेशीर भागात झोपत आहेत. परंतु, वाढते चोऱ्यांचे प्रमाण त्यांच्यासाठी चिंतेचा विषय ठरला आहे. अशा स्थितीत वाढत्या गुन्हेगारीमुळे जिल्ह्य़ात अनुचित घटना घडण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे.
जिल्ह्य़ात सध्या रब्बी पिकांची कामे व रोजगार हमीची कामे सुरू आहेत. दिवसभर अतिश्रमाचे काम करणारे मजूर गाढ झोपी जातात. गावागावात चोरांनी धुमाकूळ घातला असून पोलिसांकडून कोणतीच उपाययोजना करण्यात आलेली नाही.
प्रत्येक गावात महात्मा गांधी तंटामुक्त समित्यांचे ग्राम सुरक्षा दल नेमण्यात आले तेही निकामी ठरले आहेत. त्यामुळे गावकरीच आता एकमेकांच्या संरक्षणासाठी सरसावले आहेत. गावातील चौकाचौकात प्रौढ नागरिक व युवक गस्त घालत आहेत. दिवसभरातील कामानंतर रात्रीही विश्रांती मिळत नसल्याने सुरक्षेसह त्यांच्या आरोग्याची समस्या निर्माण झाली असून पोलिस दलाने याकडे गंभीरतेने लक्ष देण्याची गरज आहे. ज्या भागात हे प्रकार होतात त्या ठिकाणी गस्त वाढवून चोऱ्यांवर आळा बसवण्याची जबाबदारी पोलिस दलाची आहे. विशेष म्हणजे, उन्हाळ्यात प्रत्येकच वर्षी जिल्ह्य़ात चोऱ्यांचे प्रमाण वाढते. त्यामुळे पोलिस दलाने पूर्वतयारी करून नागरिकांना सतर्क करून उपाययोजना करण्याची गरज असते. पण, पोलिसांकडून फक्त नागरिकांना आवाहन करून मुक्तता पाळली आहे. पोलिस प्रशासन सुस्त असल्याने चोऱ्यांचे प्रमाण वाढू लागले आहे.