करिअरची निवड करताना विद्यार्थ्यांनी त्यांची आवड लक्षात घेतली पाहिजे. एकदा तुमच्या आवडीनुसार करिअर निवडल्यानंतर त्याचा पाठपुरावा करताना अभ्यासाबरोबरच महाविद्यालयीन उपक्रमांतही विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला पाहिजे. जेणेक रून तुमच्या व्यक्तिमत्व विकासाला मदत होते पर्यायाने तुमच्या करिअर घडवणूकीचा मार्ग सुलभ होतो, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. राजन वेळूकर यांनी केले. आजच्या स्पर्धात्मक युगात निर्माण झालेले करिअरचे विविध पर्याय पाहता मुंबई विद्यापीठानेही पारंपारिक अभ्यासक्रमांबरोबरच नवीन व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम सुरू करण्यावर भर दिला असल्याची माहितीही वेळूकर यांनी दिली. संदेश प्रतिष्ठान आणि ‘लोकसत्ता’ प्रस्तुत, ‘अंधेरी करिअर फेअर’ या अभिनव करिअर मेळाव्यात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
सार्वजनिक आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांच्या संकल्पनेतून उतरलेल्या या करिअर फेअरमध्ये र्मचट नेव्ही, ट्रॅव्हल टुरिझम, परदेशी भाषा, इंजिनिअरिंग डिप्लोमा, व्यावसायिक अभ्यासक्रम, पाईपिंग इंजिनिअरिंग, अ‍ॅनिमेशन, फायर सेफ्टी, रिटेल मॅनेजमेंटसारख्या विषयातील शिक्षण देणाऱ्या संस्था सहभागी झाल्या होत्या. करिअर कसे निवडावे इथपासून ते स्पर्धा-परीक्षा, इंजिनिअरिंग-मेडिकल प्रवेश परीक्षा आणि वाणिज्य-व्यवस्थापन क्षेत्रातील नवनविन अभ्यासक्रमांपर्यंत तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. करिअर निवडताना आपली बुध्दीमत्ता, आवड, अभिक्षमता आणि व्यक्तिमत्व या चार निकषांचा प्रामुख्याने विचार केला पाहिजे. ज्या क्षेत्रात आपल्याला ३५-४० वर्ष काम करायचे आहे ते आपले आवडीचे असलेच पाहिजे आणि ते आपल्या बुध्दीच्या कुवतीनुसार पेलवणारेही असले पाहिजे. आवडीनुसार काम करायला मिळणे ही सुद्ृढ आनंदी आरोग्याची गुरूकिल्ली असते, असे आनंद मापुस्कर यांनी सांगितले. अकरावीनंतर आपल्याला ज्या शाखेकडे जायचे आहे त्याची निवड करताना तिथे अभ्यासाला असणारे विषय, त्यातले आपल्याला सोपे जाणारे किती- कठिण किती या गोष्टींचाही साकल्याने विचार केला पाहिजे, असे त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांशी बोलताना सांगितले.
दोन दिवस चाललेल्या या करिअर मेळाव्यात एमपीएससी स्पर्धा परीक्षांबद्दल मार्गदर्शन करताना सगळ्याच स्पर्धा परीक्षांचे स्वरुप वस्तुनिष्ठ झाले असल्याने प्रश्नांची काठिण्य पातळी वाढली असल्याचे अमर खुळे यांनी सांगितले. यासाठी अभ्यास करताना सर्व मुद्यांचा विचार झाला पाहिेजे असे सांगून खुळे यांनी पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक व विक्रीकर निरीक्षक पदांसाठीच्या परीक्षेत मराठी भाषेला सर्वाधिक महत्त्व असल्याने मराठी व्याकरणाच्या सरावावरही विद्यार्थ्यांनी भर दिला पाहिजे, असा आग्रह धरला. तर युपीएससी स्पर्धा परीक्षांची तयारी करताना भूषण परदेशी यांनी सामान्य अध्ययानाच्या विषयाची मुळातून तयारी, विश्लेषणात्मक अभ्यासासाठी लागणाऱ्या पुस्तकांची, नियतकालिकांची योग्य निवड आणि सरकारी योजना, धोरणांचा अभ्यास या मुद्यांवर जोर दिला. इंजिनिअरिंग आणि मेडिकल प्रवेश परीक्षा व अभ्यासक्रमांविषयी माहिती देताना संजय कुलकर्णी यांनी इंजिनिअरिंगला प्रवेशासाठी बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेचे गुणदेखील तितकेच महत्त्वाचे असल्याने त्याक डे दुर्लक्ष करू नये, असे विद्यार्थ्यांना सांगितले. प्रवेश परीक्षांमध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जात असल्याने पाठांतरावर भर देण्यापेक्षा संकल्पनांच्या उपयोजनावर भर द्या, असा मौलिक सल्ला विद्यार्थ्यांना दिला. तर वाणिज्य आणि व्यवस्थापन क्षेत्रातील अभ्यासक्रमांबद्दल बोलत असताना वाणिज्य शाखेत बॅंकिंग, इन्शुअरन्स, अकाऊंटिंग, फायनान्स असे विविध विषयात स्पेशलायझेशनची संधी उपलब्ध झाली आहे, अशी माहिती डॉ. वरदराज बापट यांनी दिली. बारावीनंतर पदवी अभ्यासाबरोबरच या व्यावसायिक अभ्यासक्रमांचाही विचार करता येईल, असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. तज्ञांच्या मार्गदर्शनाबरोबरच करिअरच्या पाचशेहून अधिक पर्यायांची माहिती विद्यार्थ्यांना या मेळाव्यात घेता आली.